‘काळी टोपी घालून महाराजांचा अवमान करणारी घाणेरडी विकृती वेळीच नष्ट केली पाहिजे’

पुणे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात आता त्यांनी औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक वक्तव्य केल्याने नवा पेटण्याची चिन्ह आहेत. चाणक्याशिवाय चंद्रगुप्त नाही तसंच समर्थांशिवाय शिवाजी महाराज नाहीत असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे. ते आज औरंगाबादमध्ये मराठी भाषा गौरव दिवस आणि श्री दास नवमी निमित्त आयोजित केलेल्या समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आले असताना त्यांनी आपल्या भाषणामध्ये हे वक्तव्य केलं.

आज मराठी भाषा गौरव दिवस आहे, यावर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. राम मंदिर कार्यक्रम सुरू असताना मला समर्थ रामदासांचे नाव आठवत होते वेळोवेळी देशात संतांचे कार्य दिसले आहे. शक्तीची सर्वत्र पूजा होते, माजी आमदार, खासदारांना कोणी विचारत नाहीत असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

तसंच शक्ती सर्वकाही आहे, त्यामुळे शक्तीची आराधना केली जाते आपल्या देशात गुरुची परंपरा आहे. ज्याला सद्गुरु मिळाला तो यशस्वी होतो, जसं चाणक्य नसते तर चंद्रगुप्त नसते तसंच जर समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते ? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. राज्यपालांच्या या वक्तव्याने नवा वाद उभा राहण्याचे चिन्ह आहेत.

राज्यपालांच्या या वक्तव्यावरून आता प्रतिक्रिया यायला सुरवात झाली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस संतोष शिंदे यांनी राज्यपालांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत संताप व्यक्त केला आहे. ‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणतात समर्थांशिवाय शिवाजीमहाराज अपूर्ण आहेत म्हणजे आरएसएसच्या माध्यमातून छत्रपतींचा अपमान कसा केला जातो हे आज महामहिम राज्यपालांनी देखील दाखवून दिलंय. छत्रपतींचा अवमान महाराष्ट्र खपून घेणार नाही मग ते राज्यपाल का असेनात. म्हणजे घटनात्मक पदावर बसलेल्या काळी टोपी घालून राज्याचा कारभार हाकणाऱ्या व्यक्तीकडून जर असा अवमान होत असेल तर घाणेरड्या विचारांची अशी विकृती वेळीच नष्ट केली पाहिजे. असा घणाघात संतोष शिंदे यांनी केला आहे.