‘पालकमंत्री महोदय… वैद्यनाथाची शपथ घेऊन सांगा, हे रस्ते तुम्ही आणलेत का?’

परळी : जिल्हयाचे पालकमंत्री उद्या तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत काही रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करून श्रेय घेण्याचा आटापिटा करत आहेत, वास्तविक पाहता हे सर्व रस्ते पंकजा मुंडे यांच्याच कार्यकाळात मंजूर झालेले आहेत. पालकमंत्री महोदय, वैद्यनाथाची शपथ घेऊन सांगा, हे रस्ते तुम्ही आणलेत का? राज्य सरकारने दोन वर्षांत एक तरी रस्ता मंजूर केलाय का? उगाच आयत्या पीठावर रेघोटया मारू नका अशी टीका भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे यांनी केली आहे.

परळी मतदारसंघातील भिलेगाव ते कावळ्याची वाडी, जयगाव ते पांढरी तांडा, राज्य मार्ग 211 ते बोरखेड रस्ता, राज्य मार्ग 211 ते तेलसमुख, राज्य मार्ग 16 ते कौडगाव साबळा, राज्य मार्ग 16 ते देशमुख टाकळी, संगम ते लोणारवाडी, इजिमा 137 ते वाण टाकळी तांडा, राज्य मार्ग 233 ते कासारवाडी, राज्य मार्ग 211 नागदरा रस्ता हे सर्व रस्ते पंकजा मुंडे ग्रामविकास मंत्री असतांना त्यांनी मंजूर केले असून ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णय क्र. मुग्रायो-2019/प्र.क्र.426(1)/बांधकाम-4 दिनांक 4 जुलै 2019 अन्वये हे रस्ते मंजूर झाले असून प्रशासकीय मान्यता देखील त्याचवेळेस मिळाली आहे. तथापि, या कामाची निविदा प्रक्रिया उशीराने झाल्याने ती कामे आता सुरू होत आहेत.

पालकमंत्री महोदय जनतेची दिशाभूल करू नका

पंकजा मुंडे ग्रामविकास मंत्री असतांना त्यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कोट्यवधी रूपयांचा निधी देऊन तालुक्यात ग्रामीण भागात रस्ते बांधले. याच निधीतून मंजुर झालेल्या कामाचे भूमिपूजन उद्या पालकमंत्री करत आहेत. खरे पाहता, पालकमंत्र्यांनी प्रभू वैद्यनाथाची शपथ घेऊन सांगावे की, हे रस्ते त्यांनी आणलेत? गेल्या दोन वर्षांत महाविकास आघाडी सरकारने एक नवा पैसाही या योजनेसाठी दिला नाही की पालकमंत्र्यांनी आणला नाही. काही करता येत नसेल तर किमान जनतेची दिशाभूल तरी करू नका अशी टीका तालुकाध्यक्ष सतीश मुंडे यांनी पत्रकात केली आहे.