आघाडी सरकारने दिलेल्या ५ % मुस्लीम आरक्षणाचा पाठपुरावा करावा, कॉंग्रेसच्या बड्या नेत्याची मागणी 

मुंबई : आघाडी सरकारने मुस्लीम समाजासाठी ५ टक्के आरक्षण दिले होते. या आरक्षणाची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही. मुस्लीम समाजाचे आरक्षण व अल्पसंख्याक समाजासाठीच्या योजनांना भरघोस निधी मिळाला पाहिजे यासाठी काँग्रेस पक्षाने पाठपुरावा करावा, अशी मागणी माजी मंत्री तथा प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आरिफ मोहमद नसीम खान यांनी विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.

नसीम खान यांनी विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांना पाठवलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार असताना आपण मुस्लीम समाजासाठी ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी मान्यताही दिली होती परंतु त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने मुस्लीम आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही. आघाडी सरकारमध्ये मी अल्पसंख्याक विभागाचा मंत्री या नात्याने समाजासाठी अनेक योजनाही राबविल्या होत्या. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजासाठी भरघोस निधी देऊन विविध योजनाही राबवण्यात आल्या.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार सत्तेत येऊन २ वर्षे झाली पण ५ टक्के मुस्लीम आरक्षणाची अमंलबजावणी झालेली नाही. परंतु आता त्याअनुशंगाने विचारविमर्श करावा व अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी भरघोस निधीची तरतूदही करावी.

महाविकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमाच्या आधारे चालेल असे आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी यांनी सुचित केलेले आहे. त्यामुळे आपण शासनाकडे याचा पाठपुरावा करुन अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळवून द्यावा, असे या पत्रात म्हटले असून या पत्राची प्रति सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांनाही पाठवण्यात आल्या आहेत.