छत्रपतींचा पुतळा उभा करणं म्हणजे प्रेम व्यक्त करणं नव्हे, सावंतांचा राणांना टोला

अमरावती – अमरावतीच्या राजापेठ चौकातील उड्डाणपुलावर चार दिवसांपूर्वी मध्यरात्री आमदार रवी राणा व त्यांच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला होता. या पुतळ्यासाठी लागणाऱ्या आवश्यक परवानग्या आमदार रवी राणा यांनी घेतल्या नव्हत्या. त्यामुळे हा पुतळा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. दरम्यान मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात प्रशासनाने हा पुतळा काढला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवू नये अशी मागणी युवा स्वाभिमान पक्ष,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. दरम्यान, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर पोलीस व एसआरपीएफचा मोठा बंदोबस्त लावून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे अशी माहिती देखील समोर येत आहे.

खासदार नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी या प्रकारावरून शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे सरकार शिवप्रेमींची गळचेपी करत असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे. तसंच ‘आताची शिवसेना ही शिवसेना नसून ती काँग्रेस सेना झाली आहे’ अशी टीका रवी राणा यांनी केली आहे. एखाद्या अतिरेक्यांप्रमाणे आमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं गेलं. ही पद्धत अत्यंत चुकीची असल्याचं रवी राणा यांनी म्हटलंय.

यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी रवी राणा यांचा समाचार घेतला आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांना आम्ही आराध्य दैवत म्हणतो. आपली त्यांच्याबद्दलची आदराची भावना समोर ठेवताना ते आदर्श राजेही होते. अशा राजांना परवानगी न घेता कुठे कुणी काही केलं असतं तर चाललं असतं का. बाकी राजकीय सोडा, छत्रपतींच्या नावाने आलेलं सरकार वगैरे हे कुणी शिकवण्याची गरज नाही. कारण आम्ही जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत आलो आहोत’. असं अरविंद सावंत म्हणाले आहेत.

त्याचबरोबर ‘आपण नियम पाळणार की नाही? जर माझ्या दैवताची विटंबना केली तर जबाबदार कोण? तर सरकार जबाबदार. मग तुम्ही कुठेही काहीही करायचं का? त्याला रितसर परवानगी आहे. महापालिकेचा, नगरपालिकेची परवानगी आहे. जागेचा ठराव आहे. परवानगी घ्या, छानपैकी जोरदार पुतळ्याचं अनावरण करा. आनंद वाटेल, कोण नको म्हणतो. पण माझ्या मनात आलं उद्या चौकात पुतळा उभा केला. उद्या दुसऱ्यानं दुसरा पुतळा उभा केला. तर या राज्याला काही आचारसंहिता राहणार नाही, कायदा-सुव्यवस्था राहणार नाही. छत्रपतींचा पुतळा उभा करणं म्हणजे प्रेम व्यक्त करणं नव्हे. तर त्यांच्या आदर्शावर जगणं म्हणजे त्यांचा आदर करणं आहे, असं मला वाटतं’, असा टोलाही सावंत यांनी राणा दाम्पत्याला लगावलाय.