जनतेने सरकारी रुग्णालयांवर विश्वास ठेवायचा की नाही? Satyajit Tambe यांचा सरकारला उद्विग्न सवाल

- नांदेड आणि घाटी रुग्णालयांमधील दुर्घटनांनंतर व्यक्त केली चिंता

Satyajit Tambe – राज्यातील आरोग्य सेवेच्या प्रश्नाबाबत नेहमीच पुढाकार घेणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांनी नांदेड आणि घाटी येथील सरकारी रुग्णालयांमध्ये झालेल्या मृत्यूंनंतर सरकारला खरमरीत सवाल केला आहे. दोन दिवसांत या दोन सरकारी रुग्णालयांमध्ये मिळून ४३ मृत्यू झाले. सरकारी रुग्णालये मृत्यूचा सापळा बनत असून आता जनतेने सरकारी रुग्णालयांवर विश्वास ठेवायचा की नाही, असा सवाल आमदार सत्यजीत तांबे (MLA Satyajit Tambe) यांनी उपस्थित केला आहे.

नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात रविवार ते सोमवार या २४ तासांमध्ये २४ रुग्ण दगावल्याची घटना घडली. त्याशिवाय गेल्या २४ तासांमध्ये या रुग्णालयात चार नवजात बालकांसह आणखी सात जणांचा जीव गेला. तसंच आणखी ६३ जण अत्यवस्थ आहेत. या पाठोपाठच छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात २४ तासांमध्ये १२ रुग्णांचा मृत्यू झाला. याआधी ऑगस्ट महिन्यात कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातही १८ जण ४८ तासांत दगावले होते. हे बळी सरकारी रुग्णालयांमध्येच का जातात, जनतेने सरकारी रुग्णालयांवर विश्वास ठेवावा की नाही, असा प्रश्न आ. सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केला.

गेल्या दोन-तीन वर्षांच्या काळात महाराष्ट्राच्या जनतेने बदलते सरकार आणि बदलते मंत्री पाहिले, पण जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहताना कोणीही दिसत नाही. कोरोनासारख्या महामारीनंतर आरोग्य विभागासाठी जास्तीत जास्त उपाययोजना करणे किती गरजेचे आहे, याचा धडा मिळाला होता. तरीही अनुभवातून शिकून वेळीच सावध होणे सरकारला अजूनही जमलेले दिसत नाही, अशी टीकादेखील आ. तांबे यांनी केली.

राज्यात मुलभूत सुविधांचीच वानवा असेल, तर जनतेच्या हितासाठी नेमके काय काम सुरू आहे, असंही त्यांनी ट्वीटमध्ये नमूद केलं. इतक्या मोठ्या प्रमाणातील रुग्णांच्या मृत्यूंमागे सरकारी रुग्णालयात औषध पुरवठा नसणे, उपचार वेळेवर न होणे, रुग्णवाहिकांची दुरवस्था अशी कारणं समोर येत असतील, तर ही महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावणारी गोष्ट आहे, हे कटू सत्य आपल्याला स्वीकारावंच लागेल, अशी खंत बोलून दाखवत आणखी किती निष्पापांनी जीव गमावल्यानंतर सरकार शहाणं होणार आहे, असा सवाल त्यांनी केला.

सरकारी रुग्णालयांमधील मृत्यूंचं वाढतं प्रमाण चीड आणणारं आहे. यापुढे सरकार काही उपाययोजना करणार आहे की, आपण फक्त दु:खाचे सोहळे साजरे करण्यातच धन्यता मानायची, अशी उद्विग्न भावनाही त्यांनी बोलून दाखवली.

महत्वाच्या बातम्या-

भारताचा स्टार क्रिकेटर अफगाणिस्तानसाठी ठरणार हुकमी एक्का, World Cupसाठी मिळाली महत्त्वाची जबाबदारी

मतांसाठी हिरवी चादर, अफजल खान तुमचा पाहुणा लागतो काय?- Ashish Shelar

सत्ताधाऱ्यांनी कामाप्रती कार्यक्षमता दाखवली असती तर ही वेळ आली नसती – Jaynat Patil