धनगर समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेश

लातूर  : राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी देवणी, रुद्धा, उदगीर आणि जळकोट येथील प्रत्येकी एका शाळेची निवड करण्यात आली असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी 25 जुलै 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त यांनी केले आहे.

देवणी येथील आबासाहेब इंग्लिश स्कूल, अहमदपूर तालुक्यातील रुद्धा येथील सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल, उदगीर येथील जयहिंद पब्लिक स्कूल आणि जळकोट येथील महात्मा फुले पब्लिक स्कूलची या योजनेसाठी निवड झाली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 4 सप्टेंबर 2021 च्या शासन निर्णयानुसार मोफत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रवेशासाठी 25 जुलै 2023 पर्यंत लातूर येथील समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयात किंवा लातूर जिल्ह्यातील तालुका स्तरावरील शासकीय वसतिगृहात अर्ज उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी युवराज कोवाले (भ्रमणध्वनी क्र. 7385314966) यांच्याशी संपर्क साधावा.

या योजनेंतर्गत 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयात किंवा तालुकास्तरीय शासकीय वसतिगृहात उपलब्ध असलेला विहित नमुन्यातील अर्ज, जातीचा दाखला, जन्माचा दाखला, पूर्वीच्या शाळेत शिकत असल्याचे बोनाफाईड प्रमाणपत्र (इयत्ता दुसरी ते पाचवीसाठी), पालकाचे उत्पन्न (एक लाखाचे आत असावे) दाखला सादर करणे आवश्यक आहे. तरी धनगर समाजातील जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन लातूर समाज कल्याण सहायक आयुक्त यांनी केले आहे.