धुळे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांचा जीव टांगणीवर; सत्यजीत तांबे यांनी लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र

धुळे – एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यासाठी प्रयत्न होत असताना दुसऱ्या बाजूला धुळे जिल्ह्यातील तब्बल ४६९ शाळांची पडझड झाली असून परिस्थिती धोकादायक आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थी दर दिवशी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत असल्याची बाब आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री व ग्रामविकास विभाग यांच्या निदर्शनास आणली आहे. या शाळांच्या डागडुजीसाठी लागणारा निधी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा आणि शाळांची दुरावस्था दूर करावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा दर्जा उत्तम असतो. तसंच या शाळांमधील शिक्षणाचा खर्च परवडणारा असल्याने या शाळा खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांच्या शाळा मानल्या जातात. सरकारनेही या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि आधुनिक युगाशी या शाळांचा मेळ बसवण्यासाठी त्या डिजिटल करण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. या सर्व गोष्टी कौतुकास्पद असल्या तरी, या शाळांच्या इमारतींकडेही लक्ष देण्याची गरज आहे, असं मत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केलं.

धुळे जिल्ह्यातील तब्बल ४६९ शाळांमधील वर्गखोल्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. यापैकी अनेक शाळांचा वीज पुरवठाही गेल्या वर्षभरापासून खंडित आहे. त्यामुळे उन्हा-पावसात विद्यार्थ्यांना विजेविना शाळेत बसावं लागतं. तसंच अनेक ठिकाणी छताचं प्लॅस्टर पडलं असून काही ठिकाणी भिंतींनाही तडे गेले आहेत. विशेष म्हणजे या परिस्थितीमुळे पालकांनाही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवताना भीती वाटत आहे, या वस्तुस्थितीकडेही आ. तांबे यांनी या पत्राद्वारे मुख्यमंत्री व ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं.

डिजिटल शाळा ही काळाची गरज आहेच, पण त्याआधी या शाळांच्या इमारती विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित असायला हव्या. पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी घाबरायला लागले, तर यात विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान आहे. या शाळांच्या डागडुजीसाठी आवश्यक तो निधी वारंवार विनंती करूनही मिळालेला नाही. हा निधी लवकरात लवकर मिळावा आणि दुरूस्तीचं काम त्वरीत पूर्ण करावं, अशी विनंती आ. तांबे यांनी केली.

दुर्घटनेची वाट बघू नका!
धुळे जिल्ह्यातल्या शाळांच्या या दुरावस्थेबाबत याआधीही बरंच काही बोललं गेलं आहे. वारंवार विनंती करूनही डागडुजीसाठी निधी उपलब्ध होत नसेल, तर ते खरंच दुर्दैवी आहे. आता पावसाचे दिवस आहेत. अशात आधीच डळमळीत असलेल्या एखाद्या शाळेची इमारत कोसळून काही दुर्घटना घडू शकते. त्यानंतर मदत उपलब्ध झाली, तर त्याला काहीच अर्थ नसेल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आणि ग्रामविकास विभागाला माझी विनंती आहे की, असा गंभीर अपघात घडण्याआधीच निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी केली आहे.