रघुनाथ कुचिक प्रकरण : चित्रा वाघ यांनी बळजबरीने जबाब द्यायला लावल्याचा पिडीतेचा आरोप

पुणे : शिवसेना (Shivsena) उपनेते आणि किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik Rape case) यांच्यावरील बलात्कार आरोप प्रकरणाने आज नाट्यमय वळण घेतले आहे. या प्रकरणातील पिडीत तरुणीने मोठा गौप्यस्फोट करत मदतीसाठी उभा राहिलेल्या भाजपच्या (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत.

शिवसेनेचे उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात तरुणीनं तक्रार दाखल केली होती. लग्नाच्या भूलथापा देऊन कुचिक यांनी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तक्रारीत केला होता. तसंच गरोदर राहिल्यानंतर जबरदस्तीनं गर्भपात केल्याचा आरोपही केला होता. त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कुचिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आता  या प्रकरणातील पीडितेनं आपल्याला गोव्यात आणि मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीनं डांबून ठेवल्याचा गंभीर आरोप पीडितेनं केला आहे. तसंच पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला आपल्याला चित्रा वाघ यांनी भाग पाडलं, असाही खळबळजनक आरोप तिनं केला आहे.

महम्मद अहमद अंकल (चाचा) आणि चित्रा वाघ यांनी हे सर्व प्रकरण घडवून आणले असल्याचा खुलासा पीडित तरुणीने केला आहे. याशिवाय विशिष्ट यंत्रणेद्वारे माझ्या मोबाईलवरुन कुचिक यांना आणि कुचिक यांच्या मोबाईलवरुन मला मेसेज येत आहेत, असाही दावा या पिडीत तरुणीने केला आहे. त्याचसोबत काल भाजपच्या पवार नामक एका व्यक्तीने आपल्याला एक पत्र आणून दिले असून ते पोलिसांना देण्याची जबरदस्ती आपल्यावर करण्यात येतं असल्याचेही तरुणीने म्हटले आहे. हे पत्र कुचिक यांनी दिल्याचे भासवण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात आहे, असा खळबळजनक आरोपही या पीडित तरुणीने केला आहे.