शाहरुख खानने आसामच्या मुख्यमंत्र्यांना रात्री 2 वाजता फोन केला; नेमकं काय आहे कारण 

Pathan : पठाण चित्रपटाचा सुपरस्टार शाहरुख खानने वाढता विरोध पाहून रात्री उशिरा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी शाहरुखने मुख्यमंत्र्यांना फोन करून चित्रपटाविरोधात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट केले की, बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने त्यांना रात्री 2 वाजता फोन केला. यादरम्यान, खान यांनी आगामी ‘पठाण’ चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात राज्यात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या निदर्शनेबद्दल चिंता व्यक्त केली. सरमा म्हणाले की, त्यांनी खान यांना आश्वासन दिले आहे की ‘पठाण’ चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये याची काळजी राज्य सरकार घेईल.

शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाबाबत देशभरात निदर्शने सुरू आहेत. आसाममधील अनेक शहरांमध्ये या चित्रपटाविरोधात निदर्शने सुरू आहेत. बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर हिंसक निदर्शनांमध्ये उतरले आहेत. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गुवाहाटी येथील नारेंगी येथे एका सिनेमागृहाची तोडफोडही केली होती. यावेळी चित्रपटाचे पोस्टरही जाळण्यात आले.