मुंबईत ‘गांधी गोडसे एक युद्ध’च्या स्क्रीनिंग दरम्यान गोंधळ

मुंबई : 26 जानेवारीला राजकुमार संतोषी यांचा ‘गांधी गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला जोरदार विरोध होत आहे. मध्य प्रदेशानंतर देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही या चित्रपटाला प्रचंड विरोध होत आहे. नुकताच मुंबईतील एका चित्रपटगृहात ‘गांधी गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान गदारोळ झाला. येथे स्क्रिनिंगशी संबंधित पत्रकार परिषदेदरम्यान मीडियात बसलेले काही अज्ञात लोक उठले आणि त्यांनी चित्रपटाला विरोध करण्यास सुरुवात केली. आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत ‘गांधी जिंदाबाद’च्या जोरदार घोषणा दिल्या.

या चित्रपटात महात्मा गांधींचा अवमान करण्यात आला आहे तर त्यांचा मारेकरी नथुराम गोडसे यांचा गौरव करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. असे कृत्य अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे हा गोंधळ झाला तेव्हा चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषीही तिथे उपस्थित होते.

अंधेरी परिसरातील एका चित्रपटगृहात चित्रपटाचे काही फुटेज आणि संवाद प्रदर्शित करण्यात आले. प्रकरण इतके वाढले की, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. राजकुमार संतोषी यांच्यासोबत अभिनेता दीपक अंतानी आणि चित्रपटाचे सहयोगी निर्माता ललित श्याम टेकचंदानी हेही उपस्थित होते.