‘उद्धवजी … अजितदादांवर विश्वास नसेल तर कमीत कमी आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपद सोपवा’

ठाणे – आधी कोरोनामुळे आणि नंतर आजारपणामुळे गेले अनेक दिवस झाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  घराबाहेर पडत नसल्याचे चित्र आहे. याचाच फायदा घेत अनेक ठिकाणी भ्रष्ट कारभार वाढत असल्याची चर्चा जनतेमध्ये आहे. विरोधक देखील या मुद्यावरून वारंवार सरकारला डिवचत असतात.

भाजपला सत्तेवर येवू न देण्यासाठी तीन पक्ष एकत्र आले मात्र या तिन्ही पक्षात समन्वय नसल्याचे वारंवार समोर आले आहे. याचाच फायदा प्रशासनातील काही अधिकारी घेत असल्याने जनतेला वारंवार त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आता भाजपकडून मुख्यमंत्र्यांनी आपला कारभार दुसऱ्याकडे सोपवावा अशी मागणी होत आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वाढत असताना सर्वच आघाड्यांवर महाराष्ट्रात प्रचंड अनागोंदी माजली असून प्रकृतीच्या कारणामुळे प्रदीर्घ काळ राज्यकारभारापासून दूर असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तरी राज्याच्या प्रमुखपदाची सूत्रे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार किंवा अन्य सहकाऱ्यांकडे सोपवावीत, अशी मागणी भाजपच्या आमदारांनी केली आहे. अशा स्थितीत इतरांच्या हाती मुख्यमंत्री पद सोपवून राज्याला अनागोंदीपासून वाचवावे अशी मागणी ठाण्याचे भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या प्रकृतीस आराम पडावा, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. अजितदादांवर किंवा राष्ट्रवादीवर विश्वास नसेल तर आदित्य ठाकरेंकडे कार्यभार सोपवा, पण राज्याला पूर्णवेळ मुख्यमंत्री द्या, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीमुळे अनेक गंभीर प्रश्न टांगणीवर लागले असून संकटे आणि समस्यांनी घेरलेल्या महाराष्ट्रास अधिक काळ निर्नायकी ठेवणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.