शरद पवारांना लोकं विचारायचे तुम्हाला एकच मुलगी आहे, उद्या काही झालं तर अग्नी कोण देणार?

Pune – ‘पुणे डॉक्टर असोसिएशन’च्या वतीने ‘सिंगल डॉक्टर फॅमिली’ या उपक्रमाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी शरद पवारांनी उपस्थितांशी संवाद साधताना सार्वजनिक आयुष्यातील किस्से सांगितले.

केवळ एकाच मुलीवर कुटुंब नियोजन केल्यावर कोणता सामना करावा लागला असं विचारलं असता शरद पवारांनी मन जिंकणारं उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, मला फारसा काही सामना करावा लागला नाही. पण काही वेळा विविध प्रश्नांना तोंड द्यावं लागलं.

एकदा निवडणुकीनिमित्त एका गावात गेलो होतो. यावेळी एका वयोवृद्ध व्यक्तीने विचारलं, तुम्हाला एकच मुलगी आहे, उद्या अचानक काही झालं तर अग्नी कोण देणार? तेव्हा मी त्यांना सांगितलं, मला एकच मुलगी आहे आणि मला अजिबात काळजी नाही. लोकांना अग्निची चिंता आहे, ही गोष्ट मला काही मान्य नाही. हे मी त्यांना स्पष्ट सांगितलं, असं उत्तर शरद पवारांनी दिलं आहे.