अजितदादांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवत राष्ट्रवादीच्या आमदाराने काढली जंगी मिरवणूक 

पुणे – मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. झपाट्याने वाढणाऱ्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने गेल्या काही दिवसांत एकामागून एक अनेक नवीन आणि कठोर नियम केले आहेत. सर्वसामान्य नागरिकांकडून नियमांचे पालन व्हावे यासाठी सक्ती केली जात असताना राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते यांना कोरोनाचे अजिबात गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) सुद्धा राज्यातील जनतेला कोरोना नियमांचे पालन करण्याचे सतत आवाहन करत आहेत. त्यांच्या या आवाहनाचे अनेक व्हिडीओ आहेत. मात्र त्यांच्याच पक्षातील आमदार अशोक पवारांनी कोरोनाच्या नियमांचा फज्जा उडवत, घोड्यावरून मिरवणूक काढल्याचे पहायला मिळाले.

आमदार अशोक पवारांनी पुणे जिल्ह्यातल्या सणसवाडीत जंगी मिरवणूक काढली.निमित्त होतं नुकत्याच निवडणूक झालेल्या पुणे जिल्हा बँकेवर संचालकपदी झालेली निवड. त्यामुळं आनंदाच्या भरात आमदार महोदयांनी कोरोनाच्या नियमांना तिलांजली देत, जंगी मिरवणूक काढली.

जिकडे नजर जाईल तिकडे गर्दीचं गर्दी, सोशल डिस्टसिंगचा फज्जा, आपल्याच सरकारच्या नियमांचे तीन तेरा आणि मास्कचा विसर, हे सारं काही राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवारांच्या मिरवणुकीत पाहायला मिळालं. TV9मराठीने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.

या सर्व प्रकारानंतर  राज्यात कोरोनाचे संकट गडद होत असताना अशा गर्दीच्या कार्यक्रमांना परवानगी कशी मिळते, कोरोनाचे नियम फक्त सर्वसामान्यांनाच आहेत का असे सवाल विचारले जात आहेत. दरम्यान, या सर्व प्रकारामुळे आता अजितदादांच्या शब्दालाच राष्ट्रवादीत किंमत उरली नाही का ? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.