गेल्या 4 वर्षांपासून राहुल गांधी मला भेटले नाहीत; पृथ्वीराज चव्हाणांची नाराजी

मुंबई – कॉंग्रेसमध्ये सध्या वरिष्ठ पक्ष नेतृत्वाच्या विरोधात प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. अनेक दिग्गज नेते पक्षाची साथ सोडत आहेत तर अनेक नेते हे पक्षातील नेत्यांनाच झापत आहेत.  यातच आता  काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Former Chief Minister Prithviraj Chavan) यांनी देखील आता उघडपणे नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे.

चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार ते गेल्या 4 वर्षांपासून राहुल गांधींना (Rahul Gandhi) एकदाही भेटू शकले नाहीत. तसेच, उदयपूर येथे झालेल्या पक्षाच्या चिंतन शिबिरात आत्मपरीक्षण करण्यात आले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

त्यांनी सांगितले की, मी जेव्हाही दिल्लीत राहतो तेव्हा माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh) यांना भेटतो. त्यांची तब्येत आता पूर्वीसारखी नसली तरी ते नेहमी बोलायला-भेटायला तयार असतात. जेव्हा मी सोनिया गांधींना भेटण्यासाठी वेळ मागितली, तेव्हा त्याही मला भेटल्या. पण जवळपास 4 वर्षे झाली, या काळात मी राहुल गांधींना भेटू शकलो नाही.