मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाला धोबीपछाड देण्यासाठी शिंदे-फडणवीसांनी आखली जबरदस्त रणनीती

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाला चांगलाच धडा शिकवण्याचा चंग शिंदे फडणवीस यांनी बांधला आहे की काय असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे. कारण, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील तगड्या विद्यमान नगरसेवकांना आपल्या पक्षात घेतल्यास मुंबई महापालिकेत जास्तीत जास्त जागा जिंकता येतील यासाठी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षांनी रणनीती आखली आहे.

एखाद्या वॉर्डमधील विद्यमान नगरसेवक ज्या पक्षाकडे जाईल त्याला ती जागा देण्याच्या सूत्रावर शिक्कामोर्तब करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते कामालाही लागले आहेत. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना हे दोन्ही पक्ष मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्रित लढविणार असले तरीही उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील विद्यमान नगरसेवकांना निवडून येण्याची योग्यता पाहून पक्षप्रवेशाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.मटाने याबाबत वृत्त दिले आहे.