“अयोध्येत राम मंदिराच्या जागी आधी गौतम बुद्धांचं मंदिर होतं, उत्खनन केलं तर…”; रामदास आठवलेंचा दावा

Ayodhya Ram Temple, Ramdas Athawale: रामलल्लाच्या स्वागती जय्यत तयारी सुरू झाली आहे. राम मंदिराच्या (Ram Temple) सजावटीला सुरुवात झाली असून हजारो भक्तगण मंदिराला भेट देत आहेत. तसंच, मंदिर प्रशासनाकडूनही नियोजन आढावा घेतला जात आहे. २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा अभिषेक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) प्रमुख पाहुणे असतील. सोबतच देशभरातील अनेक मान्यवर, साधुसंत उपस्थित असतील.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी एक दावा केला आहे. अयोध्येत राम मंदिराच्या जागी आधी गौतम बुद्ध मंदिर (Gautam Buddha Temple) होतं असा दावा रामदास आठवलेंनी केला आहे.

“अयोध्येत जिथे राम मंदिर आहे तिथे बुद्ध मंदिर होतं. उत्खनन केलं तर ही बाब समोर येईल. मात्र बाबरी मशिद आणि राम मंदिर यांच्या वादात तिसऱ्याने पडू नये म्हणून आम्ही शांत आहोत. बाबरी मशिदीला पाच एकर जागा सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. तर आता रामाचं मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलं आहे. या वादात आपण पडून समाजात फूट पाडणं योग्य नाही म्हणून आम्ही त्यात पडलो नाही. पूर्वी त्या ठिकाणी बुद्ध मंदिर असल्याचे पुरावे आहेत. उत्खननात बुद्ध मंदिराचे अवशेष सापडले आहेत. अडीच हजार वर्षे या गोष्टीला झाली. त्यानंतर राम मंदिर त्या ठिकाणी आलं.” असा दावा रामदास आठवलेंनी केला आहे.