अंधेरी पोटनिवडणूक शिंदे गट लढण्याची शक्यता, उद्धव ठाकरे होणार चेकमेट?

Andheri East Bypoll 2022 : – शिवसेनेत फुट पडल्यानंतर दोन्ही गट एकमेकांना खिंडीत गाठण्याची एकही संधी सोडत नसल्याचे चित्र आहे. यातच आता अंधेरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनानंतर या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येत असून ही निवडणूक दोन्ही गटांनी अतिशय प्रतिष्ठेची बनवली आहे.

या जागेवर भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना संयुक्त उमेदवार देणार असून त्याची थेट लढत काँग्रेस-राष्ट्रवादीनं पाठिंबा दिलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराशी होणार आहे. या निवडणुकीत दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे. मात्र उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackrey) शह देण्याची रणनीती एकनाथ शिंदेंकडून (Eknath Shinde) सुरू आहे.

ऋतुजा लटकेंना भाजपा-बाळासाहेबांची शिवसेनेकडून उमेदवारी द्यावी, यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. ऋतुजा लटकेंचा राजीनामा मुंबई महापालिकेकडून मंजूर झाला नाही. त्या अजूनही प्रशासकीय सेवेत आहेत, त्यामुळे नवा पेच निर्माण झाला आहे. सोबतच काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे देखील वृत्त आहे.

दरम्यान, भाजप-शिंदे गट युतीमध्ये अंधेरी पूर्व मतदारसंघाची जागा बाळासाहेबांची शिवसेनेला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपाचे दावेदार उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची चर्चा आहे. निवडणूक आयोगाकडून नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाने संघर्ष करण्याची तयारी दर्शवली आहे. भाजपकडून मुरजी पटेल हे या निवडणुकीसाठी तयारी करत होते. आता शिंदे गटाकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली जाते की आणखी कोणाला संधी मिळते? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.