अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ? सुषमा अंधारेंसह ७ जणांवर गुन्हा दाखल करणाऱ्यांवर भडकले आव्हाड

ठाणे|  शिवसेना नेते विनायक राऊत (Vinayak Raut), भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात या तिघांसह एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ठाणे पोलिसांवर जोरदार टीका केली आहे.

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला शिवसेनेचे हे नेते उपस्थित होते. यावेळी सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केली होती. तर, विनायक राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात प्रक्षोभक आणि बदनामी करणारे भाषण केले होते.

या प्रक्षोभक भाषण प्रकरणी सुषमा अंधारे, आमदार भास्कर जाधव, खासदार विनायक राऊत, धर्मराज्य पक्षाचे राजन राजे, माजी नगरसेवक मधुकर देशमुख, महिला आघाडी अध्यक्ष अनिता बिर्जे, निवेदक सचीन चव्हाण यांच्यासह सात नेत्यांविरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठाणे पोलिसांच्या या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करताना जितेंद्र आव्हाड यांनी लिहिले आहे की, ‘शिवसेनेच्या तीन नेत्यांवर ठाण्यात केलेल्या भाषणाबद्दल ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे…. हे पोलिसी राज आहे … काय बोलावे कसे बोलावे हे पोलिसांनी शिकवावे … अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ?’असा सवाल उपस्थित करत आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे.