पंजाबच्या पुण्यभूमीवर काँग्रेसचे खूनी इरादे अयशस्वी ठरले; स्मृती इराणींचा हल्लाबोल

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) पंजाबच्या (Punjab) फिरोजपूरमध्ये होणारी रॅली (Rally) काल रद्द करण्यात आली. सुरक्षेत मोठी चूक झाल्यानं ही रॅली रद्द करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयानं (Home Ministry) दिलीय. मोदींचा ताफा 15 ते 20 मिनिटं फ्लायओव्हरजवळ फसला होता, आंदोलकांनी रस्ता अडवला होता, असं गृह मंत्रालयानं म्हटलंय.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने या संपूर्ण प्रकरणाचा पंजाब सरकारकडून अहवाल मागवला आहे. कृषी कायदा रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला पंजाब दौरा होता, ते पंजाबमधील तेथील जनतेला संबोधित करणार होते.विशेष म्हणजे पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे देखील या रॅलीत सहभागी होणार होते. दरम्यान,पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटींवरून काँग्रेस आणि भाजप आमने -सामने आले आहेत.

याच पार्श्वभूमीवर केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी पत्रकारपरिषद घेत, या प्रकारावरून काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. केंद्रीयमंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, “भारताच्या इतिहासात आज पंजाबच्या पुण्यभूमीवर काँग्रेसचे खूनी इरादे अयशस्वी ठरले. काँग्रेसमधील जे लोक मोदींचा द्वेष करतात, ते आज देशाच्या पंतप्रधानांना त्यांच्या सुरक्षेला कशाप्रकारे भंग करता येईल, यासाठी प्रयत्नशील होते.”

“जो आक्रोश तुम्ही माझ्यामध्ये आणि सुधांशू यांच्यात पाहात आहात. तो केवळ आमच्या राजकीय संघटनेपुरता मर्यादित नाही. आम्ही वारंवार सांगितलं. काँग्रेसला मोदींचा तिरस्कार आहे, हिशोब भारताशी आणि भारताच्या पंतप्रधानांशी करू नका. पंजाब सरकारला काँग्रेसला आज उत्तर द्यावं लागेल. पंतप्रधान कोणत्या मार्गाने एका ठिकाणी पोहचतात, त्या संपूर्ण मार्गाच्या सुरक्षेची व्यवस्था आणि कोणतीही अडचण नाही असे आश्वासन पंजाब पोलिसांनी पंतप्रधानांच्या सुरक्षा दलाला दिले होते. मग, जाणूनबुजून पंतप्रधानांच्या सुरक्षा दलास खोटं बोललं गेलं का? पंतप्रधानांच्या संपूर्ण ताफ्याला जेव्हा अडवण्याचा प्रयत्न झाला, २० मिनिटांपर्यंत जेव्हा त्यांची सुरक्षा भंग केली गेली. ज्या लोकांनी पंतप्रधांनांची सुरक्षा भंग केली. त्या लोकांना पंतप्रधानांच्या गाडीपर्यंत त्या ठिकाणापर्यंत कोणी आणि कसं पोहचलवंल?” असे प्रश्न देखील इराणी यांनी यावेळी उपस्थित केले.