शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांपेक्षा माझ्यावर काकणभर जास्तच प्रेम करत असेल – उद्धव ठाकरे

मुंबई – राज्यात शिवसेना आमदारांचा एक मोठा गट फुटून वेगळा झाल्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून मोठा सत्ता संघर्ष पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे कट्टर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत तब्बल ४२ आमदारांनी बंड पुकारलं आहे. दोन्ही बाजूंनी दावे अन् प्रतिदावे केले जात आहेत. त्यामुळे हा वाद आता विकोपाला गेला आहे. दुसरीकडे पक्षाला भगदाड पडल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) देखील पक्ष संघटना टिकवून ठेवण्यासाठी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊ लागले आहेत.

दरम्यान, शिवसेनेच्या कार्यकारिणीची महत्वाची बैठक आज शिवसेना भवन याठिकाणी पार पडली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  एकनाथ शिंदे यांच्यावर गटावर जोरदार निशाणा साधला.   बंडखोर आमदारांवर हल्लाबोल करताना ते म्हणाले, स्वत: च्या बापाच्या नावानं मतं मागा, आधी नाथ होते आता दास झाले असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर जोरदार हल्लाबोल केला.

शिवसेनाप्रमुखांपेक्षा माझ्यावर काकणभर जास्त प्रेम

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा आपल्यावर शिवसेना कार्यकर्त्यांचं काकणभर जास्तच प्रेम आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. “शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून अनेकांना मी सांगतो. तुम्ही हसाल. पण जर शिवसैनिकांना विचारलं तर तो शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांपेक्षा माझ्यावर काकणभर जास्तच प्रेम करत असेल. कारण केवळ मी त्यांचा मुलगा आहे म्हणून”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.