वसंत मोरेंना आपल्या पक्षात घेण्यासाठी सेना- राष्ट्रवादीत चढाओढ; दोन्ही पक्षाचे नेते संपर्कात ?

पुणे – मशिदींवरील भोंगे काढून न टाकल्यास त्यासमोर स्पीकरवर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावण्याची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी झालेल्या मेळाव्यामध्ये घेतली होती. त्यानुसार काही भागात मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसेचा जाप देखील सुरू केला.

दरम्यान, मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे(Vasant More) यांनी मात्र या भूमिकेच्या विरोधात भूमिका घेत शहरात भोंगे लावणार नसल्याचं जाहीर केलं. त्यामुळे मनसेमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं. त्याचाच परिणाम म्हणून आज राज ठाकरेंनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना भेटीसाठी पाचारण केलं असताना वसंत मोरेंना त्यातून वगळण्यात आलं होतं. अखेर त्यांची पुणे शहर अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

राज ठाकरेंनी पत्र काढत साईनाथ बाबर (Sainath Babar) यांची पुणे शहरअध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, मोरे यांना पदमुक्त केल्यानंतर आता त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चढाओढ लागल्याचे पाहायला मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी आणि शिवसेना वसंत मोरेच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. आता शेवटी वसंत मोरे यांच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

दरम्यान, गेल्या दोन तीन दिवसांपासून खूप लोक मला मनसे सोडण्यासाठी संपर्क करत आहेत. मात्र मी सर्वांना आत्ताच मनसे सोडण्याचा विचार नाही, असे सांगत आहे. ज्या दिवशी माझ्या मनात अस विचार येईल त्या दिवशी मी उघडपणे सांगेल, असेच मी सर्वपक्षीय लोकांना सांगत आहे, असेही वसंत मोरे म्हणाले आहे.