नवनीत राणांचा चहा पितानाचा व्हिडीओ समोर आल्यावर राम कदम यांनी केला ‘हा’ अजब दावा 

मुंबई : मागासवर्गीय असल्याने आपल्याला पोलिसांनी पाणी दिलं नाही, असा गंभीर आरोप खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी केला होता. या संबंधी नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला (Omprakash Birla) यांनाही पत्र लिहिलं होतं. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राज्य सरकारला 24 तासात उत्तर देण्याचे आदेश दिले होते. मात्र या प्रकरणात ट्विस्ट आला आहे.

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) यांनी ट्वीट करुन खार पोलीस स्टेशनमधला सीसीटीव्ही फूटेज (CCTV Footage) शेअर केलं आहे. या फूटेजमध्ये राणा दाम्पत्य खार पोलीस स्टेशनमध्ये चहा पीत असताना दिसत आहे. सोबतच पाणी देखील त्यांच्यासमोर आहे. या सर्व घडामोडींवर आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी भाष्य केले आहे.

ते म्हणाले, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा स्वतः म्हणत असतील की आम्हाला पाणी देखील नाकारलं, तर आपल्याला ती गोष्ट नाकारून चालणार नाही. वादानंतर ते खासदार आहेत, आमदार आहेत हे पोलिसांच्या लक्षात आलं असेल, पुढे जाऊन प्रकरण आपल्या डोईशी येईल असं वाटल्याने पोलिसांनी समजूत घालण्यासाठी राणांना चहा दिला असेल. साधारणपणे असंच होतं.

सुरुवातीला वाद होतात आणि मग नंतर समजूत घालण्यासाठी आम्ही जे करतोय ते वरून सांगण्यात आलंय, आम्ही करत नाहीये असं बोललं जातं. आम्ही पोलीस अधिकारी आहोत, आम्ही आदेशाचे ताबेदार आहोत, अशाप्रकारचे अनुभव मी स्वतः आमदार म्हणून अनुभवले आहेत, असंही राम कदम यांनी नमूद केलं.