मी गरीब कुटुंबातील सर्वसामान्य माणूस असूनही आमदार झालो हे खडसेंच्या जिव्हारी लागलं – चंद्रकांत पाटील

जळगाव – सामान्य कुटुंबातील गरीब व्यक्ती आमदार झाल्याने खडसे वैफल्यग्रस्त झाले आहेत अशी टीका जळगावातील मुक्ताईनगरचे (Muktainagar) शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे. एकनाथ खडसेंकडून महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

एकनाथ खडसे यांच्याकडून मला वारंवार टार्गेट करुन त्रास देण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे मी माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून वस्तुस्थिती सांगणार आहे, आता बस झाले त्रास सहन करणे, असंही आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले.

मीही महाविकास आघाडीचा एक घटक आहे आणि अशाप्रकारे महाविकास आघाडीच्या नेत्याने माझ्यावर टीका करत महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रकार चालू आहे. 35 वर्षांपासून मतदारसंघात विकास खुंटला, मी विकास कामे करायला लागलो आणि त्यांना जिव्हारी लागले, अशी तोफही चंद्रकांत पाटील यांनी डागली आहे.