मोठी बातमी : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आजच राजीनामा देण्याची शक्यता

कराची – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठरावावर मतदानापूर्वी शेजारील देशात मोठी खळबळ उडाली आहे. या खळबळीचे मोठे कारण म्हणजे पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पंतप्रधान इम्रान खान राजीनामा देऊ शकतात, असे संकेत पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनी दिले आहेत.

महागाई आणि इतर मुद्द्यांवरून विरोधी पक्ष अनेक दिवसांपासून इम्रान खान यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. यातच अर्थसंकल्पानंतर आपण निवडणुकीच्या दिशेने जाऊ शकतो, असे मी खान साहेबांना सांगितले आहे, असे गृहमंत्री म्हणाले. पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी देशात लवकर निवडणुका होऊ शकतात, असे संकेत दिले आहेत.

राजकीय तज्ञांच्या मते आज इम्रान खान पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊ शकतात. इम्रान खान यांची इस्लामाबादमध्ये मोठी सभा असून इम्रान खान आपल्या समर्थकांना भावनिक आवाहन करून राजीनाम्याची घोषणा करू शकतात, असे मानले जात आहे. दरम्यान, इम्रान खानविरोधातील अविश्वास प्रस्तावावर ३ ते ४ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.