कृष्णाची भक्ती करते म्हणून नवऱ्याने दिला तलाक, अखेर हिंदू मित्राशी लग्न करत शहनाज झाली आरोही

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एका मुस्लिम तरुणीने हिंदू मित्राशी लग्न केले. बरेलीच्या फरीदपूर पोलीस ठाण्याच्या ढाकनी राजपुरा गावात राहणारी शहनाज हिचा विवाह २०१८ मध्ये झाला होता. पण ती लहानपणापासूनच भगवान श्रीकृष्णाची भक्त होती आणि अनेकदा भगवान श्रीकृष्णाची पूजा करत असे. शहनाजच्या कुटुंबीयांनीही त्यांच्या धर्मात अशा प्रकारे पूजा केली जात नाही असे म्हणत तिच्या कृष्णभक्तीचा विरोध केला. तिला इस्लाम धर्मानुसार जगण्यास सांगितले, पण तिने कोणाचेही ऐकले नाही, लग्नानंतरही ती भगवान श्रीकृष्णाची भक्त राहिली. हा प्रकार सासरच्या मंडळींना कळताच सर्वजण नाराज झाले. तिला सासरच्या घरी कृष्ण भगवानची पूजा पाठ करताना पती आणि सासरच्या लोकांनी पाहिल्यावर एकच गोंधळ उडाला आणि हे पाहून पतीने तिला तिहेरी तलाक दिला.

जेव्हा मुलीने तिचा बालपणीचा मित्र पवन कुमारला आपल्या वेदनांची कहाणी सांगितली. त्यानंतर तिने धीर सोडला. कारण त्यांच्या मैत्रीचे हळूहळू प्रेमात रुपांतर झाले आणि दोघांनी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी घर सोडले आणि बरेली गाठले आणि अगस्त मुनी आश्रमात जाऊन हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले. शहनाजने आपली संपूर्ण कहाणी आश्रमाच्या महंतांना सांगितली. अगस्त मुनी आश्रमात लग्न झाल्यानंतर शहनाजने आता हिंदू रितीरिवाजांनुसार आपले नाव ठेवले आहे. शहनाजने सांगितले की, आता तिला आरोहीच्या नावाने हाक मारावी.

लग्नापूर्वी महंत के.के.शंखवार यांनी अगस्त मुनी आश्रमात दोघांचे म्हणणे ऐकून घेत मुलीचे सनातन धर्मानुसार शुद्धीकरण करून मंत्रोच्चारात सनातन धर्मानुसार विवाह लावला. सात प्रदक्षिणा केल्या आणि सात वचने देऊन दोघांना आशीर्वाद दिला.

धर्मांतर आणि लग्नानंतर मुलीने पोलीस प्रशासनाला पत्र लिहून सुरक्षेची विनंती केली आहे. आपल्या जीवाला कुटुंबाकडून धोका असल्याचे मुलीचे म्हणणे आहे. तसेच आरोहीचा मित्र ज्याच्याशी तिचे आता लग्न झाले आहे, त्यांच्या जीवालाही धोका असल्याचे तिचे म्हणणे आहे. तिने बरेलीच्या पोलीस अधिकाऱ्याला पत्र लिहून संरक्षणाची विनंती केली आहे.