शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसच्या गोटात भूकंप? दिग्गज नेता राजीनामा देण्याच्या तयारीत

मुंबई – विधान परिषदेच्या निकालाने (Result of the Legislative Council) महाविकास आघाडीला (MVA) झटका बसला असून, शिवसेनेतील (Shivsena) महत्त्वाचे नेते आणि सध्या कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे वृत्त आहे. शिंदे हे सध्या गुजरातमध्ये (Eknath Shinde in Gujarat) गेले आहेत. सध्या ते सुरतमधील ली मेरिडिअन या हॉटेलमध्ये आहेत अशी माहिती समोर येत आहे.

गेले काही वर्ष नाराज असलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्याच्या गटाचे आमदार यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे अशी माहिती समोर येत आहे. यातच आता दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत. महसूल मंत्री असलेले बाळासाहेब थोरात विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. तशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

काँग्रेसचे पहिल्या क्रमांकाचे उमेदवार असलेले चंद्रकांत हंडोरे काल झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभूत झाले. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली. या पराभवाची जबाबदारी मी घेतो, असं थोरात काल म्हणाले होते. आता थोरात काँग्रेसच्या गटनेतेपदावरून पायउतार होण्याच्या मनस्थितीत असल्याचं समजतं.