व्वा रे मर्दा..! लग्नासाठी कुणी मुलगी देत नाही म्हणून तरुणाचा थेट आमदाराला फोन

औरंगाबाद: तरुण मुलांसाठी हल्ली लग्न (Marriage) ही मोठी समस्या बनली आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. याचं जिवंत उदाहरण द्यायचं झाल्यास, काही दिवसांपूर्वीच सोलापूरातील काही तरुण मंडळींनी लग्नासाठी मुलगी मिळत नाही, म्हणून मोर्चा काढला होता. यानंतर आता एका तरुणाने याच कारणामुळे चक्क आमदाराला फोन लावला असल्याची गमतीशीर घटना घडली आहे.

सोशल मीडियावर महाराष्ट्रातील एका तरुणाची ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे. यात एका तरुणानं थेट आमदाराला फोन करून लग्नासाठी कुणी मुलगी देत नाही अशी खंत व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे या तरुणाच्या समस्येला आमदारांनी दिलेले उत्तर पाहून सर्वांनाच हशा फुटेल.

त्याचे झालं असे की, औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत (Udaysingh Rajput) यांना खुल्ताबाद तालुक्यातील एका तरूणाने फोन केला. घरी सर्व काही चांगलं आहे, आठ एकर शेती देखील आहे. पण तरीही लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याचं दुखः व्यक्त केलं. तर हा तरुण एवढ्यावरच थांबला नाही, तुमच्या सर्कलमध्ये मुली असतील तर पहा ना अशी मागणी केली. यावर राजपूत यांनी देखील तरुणाला नाराज न करता, बायोडाटा पाठवून द्या, बघतो म्हणत आश्वासन दिले. सद्या या संभाषणाची ऑडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

नेमका काय आहे हा संवाद?
तरूण – हॅलो, साहेब जय महाराष्ट्र
आमदार – जय महाराष्ट्र
तरूण – रत्नपूरहून विजय होळकर बोलतोय, ग्रामीणमधून
आमदार – बोला, बोला
तरूण – काय निवांत का?
आमदार – नाही, एकाठिकाणी बसलोय
तरूण – साहेब, असा विषय होता, ८-९ एकर जमीन आहे. घरी चांगली परिस्थिती आहे. पण इथं कुणी मुलगीच द्यायला तयार नाही.
आमदार – कुठं?
तरूण – रत्नपूर, खुलताबाद, भद्रा मारूतीजवळ
आमदार – तुमचा बायोडाटा पाठवून द्या
तरूण – रत्नपूरपासून ६ किमी गाव आहे. परिस्थिती चांगली आहे.
आमदार – बायोडाटा पाठवून द्या.
तरूण – तुमच्या कन्नड सर्कलमध्ये भरपूर मुली आहेत साहेब
आमदार – बरं बरं ठीक आहे, बोलतो