‘हिटमॅन’चा कहर! रोहित शर्माची बॅट तळपली, श्रीलंकेविरुद्ध ८३ धावांची शानदार खेळी खेळली

गुवाहाटी: टी२० मालिकेनंतर भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात ३ सामन्यांची वनडे मालिका (ODI Series) सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना गुवाहाटी येथे आज खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा रुद्रावतार पाहायला मिळाला. ‘हिटमॅन’ रोहितने लौकिसास साजेशी खेळी करत संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. मात्र तो आपले शतक पूर्ण करू शकला नाही.

रोहितने शुबमन गिलसोबत (Shubman Gill) सलामीला फलंदाजीला येत झंझावाती अर्धशतक झळकावले. ६७ चेंडूंचा सामना करताना १२३.८८ च्या स्ट्राईक रेटने त्याने ८३ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ३ षटकार आणि ९ चौकार निघाले. हे रोहितचे सलग दुसऱ्या वनडे सामन्यातील अर्धशतक होते. मागील वनडे सामन्यात त्याने नाबाद ५१ धावा केल्या होत्या. याबरोबरच रोहितने वनडेतील ९५०० धावांचा टप्पाही ओलांडला आहे.