महिलांची ऑनलाईन बदनामी प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून दखल

मुंबई – एका अॅपवर शेकडो मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड केल्याची घटना समोर आली आहे. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी शनिवारी सांगितले की, होस्टिंग प्लॅटफॉर्म गिटहब वापरून शेकडो मुस्लिम महिलांचे फोटो अॅपवर अपलोड केले आहेत. ही बाब मुंबई पोलिसांकडे मांडण्यात आली आहे.

याप्रकरणी खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली असून, दोषींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. त्यांनी ट्विट केले की, “मी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) रश्मी करंदीकर जी यांच्याशी बोलले आहे. मी मध्यस्थी करण्यासाठी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांशीही (डीजीपी) बोलले आहे. या प्रकारामागे जे लोक आहेत त्यांना पकडले जाईल अशी आशा आहे.

दरम्यान, आता याप्रकरणाची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दखल घेतली आहे. त्यांनी ट्वीट करत दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. चाकणकर यांनी ट्वीट करत अशा घटनांचा निषेध केला आहे. तसेच महिला आयोग कार्यालयाने दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र सायबर विभागाला दिले आहेत. या सुल्ली डील ॲप वरून महिलांसंबंधीची माहिती विविध समाजमाध्यमांवरसुद्धा प्रसारित झाली आहे त्यामुळे सर्व समाज माध्यमंवरून ती माहिती तात्काळ काढून टाकण्यात यावी असे देखील त्यांनी म्हटले आहे.

समाजात तेढ निर्माण करून देशातील शांतता बिघडवायची आणि आपले राजकीय हेतू साध्य करण्याचे प्रयत्न काही लोक करत असल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. तसेच असे ॲप तयार करून संकलित माहितीचा प्रसार करण्यासाठी मोफत व अनियंत्रित प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणाऱ्या ‘गिटहब’ विरुद्ध सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयाने महाराष्ट्र सायबर विभागाला दिले आहेत.