शेन वॉर्नचा पदार्पणाचा सामना रवी शास्त्रींनी अष्टपैलू कामगिरी करत गाजवला होता 

मुंबई – वर्ष 1992, सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तिसरा कसोटी सामना. तारीख होती 2 जानेवारी. भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला त्यावेळी कोणालाच माहीत नव्हते की, जो ऑस्ट्रेलियन खेळाडू पदार्पणाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरतो, तो जागतिक क्रिकेटचा महान गोलंदाज बनेल. हा सामना त्या खेळाडूसाठी खास होता कारण तो आंतरराष्ट्रीय पदार्पणाची कसोटी खेळत होता, पण या सामन्यात एका भारतीय खेळाडूने सर्वांची मने जिंकली. कसे घडले ते जाणून घ्या…

टीम इंडिया 1992 मध्ये मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती. यादरम्यान त्याला पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची होती. कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना 2 जानेवारीपासून खेळवण्यात आला. हा शेन वॉर्नचा आंतरराष्ट्रीय पदार्पण सामना होता. हा सामना त्याच्यासाठी तर खासच होता, सोबतच रवी शास्त्रीसाठीही तो खूप खास ठरला. कारण होते शास्त्रीचे दमदार द्विशतक.

भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 313 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडिया पहिला डाव खेळण्यासाठी मैदानात उतरली. भारताकडून रवी शास्त्री आणि नवज्योतसिंग सिद्धू सलामीला आले. सिद्धू खाते न उघडताच बाद झाला. पण शास्त्रींनी खिंड लढवत 477 चेंडूत 206 धावा केल्या. या खेळीत शास्त्रींनी 17 चौकार आणि 2 षटकार मारले. या खेळीमुळे टीम इंडियाने पहिल्या डावात 483 धावा केल्या.

यानंतर ऑस्ट्रेलियन संघ दुसरा डाव खेळण्यासाठी मैदानात उतरला. पण जास्त वेळ क्रीझवर जम बसवू शकला नाही. दुसऱ्या डावात 8 गडी गमावून 173 धावा केल्या ;पण पुढे हा सामना अनिर्णित राहिला. शास्त्रींनीही यावेळी 25 धावांत 4 बळी घेतले. त्याच्या चांगल्या फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी त्याला ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आले. अशाप्रकारे शेन वॉर्नचा पदार्पणाचा सामना रवी शास्त्रीच्या नावावर झाला.