दाऊदसाठी मनी लाँडरिंग केल्याचा आरोप असणाऱ्या मलिक यांना शिवसेनेचा भक्कम पाठींबा ?

मुंबई : मुंबई बॉम्बस्फोटात शेकडोंचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्यासाठी मनी लाँडरिंग केल्याच्या आरोपावरून अटक झालेले मंत्री नवाब मलिक यांना महाविकास आघाडीकडून पाठींबा  मिळत असल्याचे चित्र आहे. भाजपकडून मलिक यांना  पाठिंबा देणे म्हणजे दाऊद इब्राहिमला साथ देणे आहे असा आरोप केला जात आहे .

दरम्यान, नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर काल  शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी  गेले होते.  नवाब मलिक यांचे भाऊ नगरसेवक कप्तान मलिक, मुलगी सना खान, बहीण नगरसेविका सईदा खान यांच्या सह सर्व कुटुंब इथे उपस्थित होते. तर संजय राऊत यांच्यासह त्यांचे भाऊ आमदार सुनील राऊतही उपस्थित  होते.

दरम्यान, अटक झालेल्या नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा देखील घेतला जावा अशी मागणी केली जात आहे पण मुख्यमंत्री मात्र त्यांचा राजीनामा घ्यायला तयार नसल्याचे दिसत आहे. यातच शिवसेनेचे सध्याचे सर्वात मोठे नेते संजय राऊत हे घरी जाऊन मलिक कुटुंबाची भेट घेत आहेत त्यामुळे अनेक गंभीर आरोप असणाऱ्या मलिक यांना अधिकृतपणे ठाकरे कुटुंब व शिवसेना यांचा पाठींबा  आहे का ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

दरम्यान, नुकतेच नवाब मलिक यांना  विशेष पीएमएलए न्यायालयाने त्यांना ७ मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. नवाब मलिक यांना ईडीच्या कोठडीतून दिलासा मिळालेला नाही. त्यांना ७ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.