ज्या व्यक्तीने हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना दुखावलं त्या व्यक्तीच्या टीकेवर मी काय बोलणार? – सुळे   

मुंबई – मनसे मेळाव्यातील भाषणानंतर झालेल्या टीकेला पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेतून उत्तर दिलं. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेवर राज यांनी पुन्हा एकदा हल्ला चढवला. या सभेनंतर महाविकास आघाडीकडून राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं जात आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात पवार घराण्याकडून झालेल्या टीकेचा समाचार घेतला. ते म्हणाले,  सुप्रिया सुळे म्हणतात, लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटिशीने बदलतील याचं मला आश्चर्य वाटतं. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी रेड पडते, पण तुमच्या घरी रेड पडत नाही याचं कारण मला कळेल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सुप्रिया सुळेंचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे ‘सुळे’ वेगळे आहेत. अजित पवारांकडे रेड पडते. त्यांच्या सख्ख्या बहिणींकडे रेड पडते. त्यानंतरही शरद पवार आणि नरेंद्र मोदींचे अत्यंत मधुर संबंध राहतात. कसे? मी कधी बघितलं नाही शरद पवारांना भडकलेले. मी उघडपणे बोलत होतो, तेव्हा या सगळ्यांच्या शेपट्या आत होत्या.असा घणाघात त्यांनी केला.

दरम्यान, आज सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी संवाद साधला.  मी पूर्ण भाषण बघितलं नाही. जे वाचलं त्यातून ९५ टक्के ते राष्ट्रवादीवर बोलल्याचं कळलं. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष किती महत्त्वाचा आहे, हेच ते म्हणाले आहेत. त्यांच्या भाषणातील मुद्दे आश्चर्यकारक होते, कारण व्यक्तिगत हल्ला होता. देश आणि राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत. त्यावर बोलायला हवं. ते यावर ते काहीच बोलले नाहीत. इतिहासात रमले. ज्या व्यक्तीने हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना दुखावलं. त्या व्यक्तीच्या टीकेवर मी काय बोलणार?, असं सुळे म्हणाल्या.

ते इतिहासात रमतात. राजकीय पक्षाने इतिहास जरूर वाचावा, पण देशाचं-राज्याचं वास्तव बघितलं पाहिजे. धोरणात्मक काम केलं पाहिजे.  ईडीची नोटीस अजित पवारांना, सुप्रिया सुळेंना का नाही?, असं ठाकरे भाषणात म्हणाले होते. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवारांनी चांगलं उत्तर दिलं आहे की, वेळ आल्यावर उत्तर देऊ. मी स्वतः समोर असलेल्या प्रश्नावर वेळ घालवतेय. अजित पवारांच्या किंवा माझ्या घरी रेड झाल्या नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.