चित्रा वाघ अडचणीत येताच रुपाली पाटलांनी केली गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुणे : शिवसेना (Shivsena) उपनेते आणि किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik Rape case) यांच्यावरील बलात्कार आरोप प्रकरणाने  नाट्यमय वळण घेतले आहे. या प्रकरणातील पिडीत तरुणीने मोठा गौप्यस्फोट करत मदतीसाठी उभा राहिलेल्या भाजपच्या (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत.

पीडितेनं आपल्याला गोव्यात आणि मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीनं डांबून ठेवल्याचा गंभीर आरोप पीडितेनं केला आहे. तसंच पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला आपल्याला चित्रा वाघ यांनी भाग पाडलं, असाही खळबळजनक आरोप तिनं केला आहे. महम्मद अहमद अंकल (चाचा) आणि चित्रा वाघ यांनी हे सर्व प्रकरण घडवून आणले असल्याचा खुलासा पीडित तरुणीने केला आहे. याशिवाय विशिष्ट यंत्रणेद्वारे माझ्या मोबाईलवरुन कुचिक यांना आणि कुचिक यांच्या मोबाईलवरुन मला मेसेज येत आहेत, असाही दावा या पिडीत तरुणीने केला आहे.

त्याचसोबत काल भाजपच्या पवार नामक एका व्यक्तीने आपल्याला एक पत्र आणून दिले असून ते पोलिसांना देण्याची जबरदस्ती आपल्यावर करण्यात येतं असल्याचेही तरुणीने म्हटले आहे. हे पत्र कुचिक यांनी दिल्याचे भासवण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात आहे, असा खळबळजनक आरोपही या पीडित तरुणीने केला आहे.

दरम्यान, रघुनाथ कुचिक प्रकरण पीडितेने माझ्यावर केलेले आरोप आताचं ऐकले. खरंतर वाईट वाटलंय पण हरकत नाही असे ही अनुभव  येतात. फेब्रुवारीपासून एकटी लढणाऱ्या पीडितेसोबत उभे राहिले तेव्हा कुणी तिच्या मदतीला नव्हतं आज मात्र माझ्याविरोधात सगळे एकत्र याचा आनंद वाटला. मी सगळ्या चौकशींसाठी तयार आहे, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली.

दरम्यान, आता याच मुद्द्यावरून मनसेतून राष्ट्रवादीत नुकताच प्रवेश केलेल्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्या म्हणाल्या, कायदेशीर प्रक्रियेत हस्तक्षेप,डांबून ठेवणे, फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी, app चा वापर करून sms पाठवणे खोटे sms तयार करणे, खोटी तक्रार देण्यास भाग पाडणे, चित्र वाघ आणि साथीदार यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करणे. असं त्यांनी म्हटले आहे.