रझा अकादमी मोर्चाच्या हिंसाचार प्रकरणी डीसीपी मकानदार यांच्यावर कारवाई करा; भाजपाची मागणी

अमरावती – 12 नोव्हेंबर ला रझा अकादमीचा पूर्वनियोजित मोर्चा निघाला तेव्हा पोलीस आयुक्त पदाचा प्रभार असलेले पोलीस उपायुक्त एम एम मकानदार यांनी हेतुपुरस्सर मुस्लिम मोर्चाच्या वेळी शहरात पोलीस बंदोबस्त लावला नाही, असे जनमत तयार झाले आहे. हिंसाचार सुरू झाल्यावरही पोलीस बघ्याच्या भूमिकेत होते. मकानदार यांनी परिस्थितीकडे दुर्लक्ष का केले, यासारखे अनेक अनुत्तरित प्रश्न असून मकानदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आज भाजपाच्या वतीने पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांच्याकडे करण्यात आली.

भाजपाचे शहर जिल्हा अध्यक्ष किरण पातूरकर, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, उपमहापौर कुसुमताई साहू, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा. रवींद्र खांडेकर यांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

12 नोव्हेंबर रोजी रझा अकादमीने अमरावतीत चाळीस हजाराचा मोर्चा काढला. या मोर्चाने अमरावतीत दंगा घडवला. या संघटित गुन्हेगारी विरोधात अजूनही योग्य तपास आणि कठोर कारवाई झालेली नाही, असे अमरावतीकरांचे मत आहे. या मोर्चामुळे उदभवलेल्या भीषण परिस्थितीचे दुष्परिणाम अमरावतीकरांना आजही भोगावे लागत आहेत. आम्ही भाजपासह सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी आतापर्यंत पोलिसांना आवश्यक ते सर्व सहकार्य केले आहे. मात्र, आता पोलिसांकडून काही प्रमाणात एकतर्फी कारवाया केल्या जात आहेत, त्या थांबवण्यात याव्या अशी मागणीही करण्यात आली.

12 नोव्हेंबर ला रझा अकादमीचा पूर्वनियोजित मोर्चा निघाला तेव्हा आपण पोलीस आयुक्त रजेवर होत्या. पोलीस आयुक्त पदाचा प्रभार असलेले पोलीस उपायुक्त एम एम मकानदार यांनी हेतुपुरस्सर मुस्लिम मोर्चाच्या वेळी शहरात पोलीस बंदोबस्त लावला नाही, असे जनमत तयार झाले आहे. हिंसाचार सुरू झाल्यावरही पोलीस बघ्याच्या भूमिकेत होते. मकानदार यांनी परिस्थितीकडे दुर्लक्ष का केले ? 13 नोव्हेंबर रोजी राजकमल चौकात जमाव घोषणाबाजी करत असताना ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, पोलीस अधिकारी श्री. सातव हे परिस्थिती हाताळत असताना सकाळी 10. 45 दरम्यान एम एम मकानदार राजकमल चौकात पोहचले. आदल्या दिवशी मौन बाळगलेल्या मकानदारांनी जमाव हिंसक नसतानाही जमावावर लाठीमार केला. या लाठीमारानेच परिस्थिती चिघळली.

शांततेत आंदोलन करणाऱ्या हिंदू समाजाच्या युवकांवर लाठीमार करणाऱ्या मकानदारांनी आदल्या दिवशीच्या हिंसाचाराकडे दुर्लक्ष का केले ? व्यापाऱ्यांची दुकाने लुटली जात असताना, दुकाने फोडली जात असताना मकानदारांना कारवाई करण्यापासून कोणी रोखले होते ? दुसऱ्या दिवशीचे आंदोलन वेळेवर ठरले असताना ते दडपण्याची पुरेपूर व्यवस्था करणारे मकानदार रझा अकादमीच्या मोर्चावर मेहेरबान का होते ? हिंसाचाराची एवढी झळ सोसावी लागल्यानंतरही मकानदार यांच्यावर अजूनही कारवाई नाही. मकानदार यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, ही आमची मागणी असल्याचे भाजपा शिष्टमंडळाने स्पष्ट केले.

हिंदू समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक केल्यावर आणि त्यांनी जमानत घेतल्यावरही पुन्हा पुन्हा त्यांना विविध प्रकरणात गोवले जात आहे. या कार्यकर्त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची नाही. तरीही त्यांना गुन्हेगारांसारखी वागणूक दिली जात आहे. ती थांबण्यात यावी. अमरावतीतील हिंसाचाराला 12 नोव्हेंबरचा रझा अकादमीचा धुडगूस कारणीभूत असून केवळ हिंदूच दोषी असल्याचे चित्र रंगवले जात आहे. याचे दुष्परिणाम वाईट होत आहेत. पोलिसांनी यात निःपक्षपाती भूमिका घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाच्या शिष्टमंडळाने केली आहे.