घरात नवीन पाहुणा येणे हा अत्यंत आनंददायी क्षण; रुपाली पाटलांनी दिल्या ठाकरे कुटुंबाला शुभेच्छा

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या परिवारासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज ठाकरे (Raj Thackrey)यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackrey)आणि सून मिताली ठाकरे (Mitali Thackrey) यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे.

ब्रीच कँन्डी रुग्णालयात मिताली यांनी गोंडस बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे राज ठाकरे आता आजोबाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. काही महिन्यांपूर्वीच राज हे त्यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानावरुन सहकुटुंब ‘शिवतीर्थ’ या नव्या निवासस्थानी शिफ्ट झाले. याच नवीन घरामध्ये आता ही चिमुकली पावलं खेळताना बागडताना दिसणार आहेत. या निमित्ताने आता ठाकरे परिवारावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यातच आता मनसेच्या माजी नेत्या  रुपाली पाटील ठोंबरे यांनी देखील ठाकरे परिवाराला या आनंदाच्या क्षणी शुभेच्छा दिल्या आहेत.

त्या म्हणाल्या, मा.अमित राजसाहेब ठाकरे व सौ. मिताली ठाकरे आपले मनःपूर्वक अभिनंदन. घरात नवीन पाहुणा येणे हा अत्यंत आनंददायी क्षण, तोची दिवाळी दसरा. आपले मनःपूर्वक अभिनंदन मा. राजसाहेब ,मा.शर्मिला वहिनीसाहेब आजोबा, आजी झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. असं त्यांनी म्हटले आहे.