मोदीसरकार हे भांडवलदारांचे आहे; राष्ट्रवादीचा आरोप

मुंबई – मोदीसरकार हे भांडवलदारांचे आहे हे आम्ही आधीपासूनच बोलत आहोत हे आता रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांच्या वाढत्या आत्महत्येवरुन स्पष्ट झाले आहे असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. २०१४ मध्ये मोदीसरकार देशात आल्यानंतर देशात रोजंदारी करणार्‍या व बेरोजगारांसाठी एक वाईट काळ सुरू झाला असा थेट हल्लाबोलही महेश तपासे यांनी केला.

काल नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा एक सर्वे प्रसिद्ध झाला असून त्यामध्ये भारतात रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांच्या आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त आहे असेही महेश तपासे म्हणाले.

मोदीसरकार भांडवलदारांचे आहे हे आम्ही आधीपासूनच बोलत होतो परंतु या सर्वेनुसार रोजंदारी करणार्‍या लोकांच्या आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे. याचा अर्थ देशातील सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोदीसरकारने काहीच केले नाही असा आरोपही महेश तपासे यांनी केला.

नोटबंदी करुन सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडलेच शिवाय कोरोना काळात अचानक केलेले लॉकडाऊन यामध्ये अनेकांना बेरोजगार आणि नोकर्‍यांना मुकावे लागले होते मात्र त्यांना दिलासा देण्याऐवजी मोठ्या भांडवलदारांची कर्ज माफ करून मोदीसरकार भांडवलदारांच्या पाठिशी असल्याचे स्पष्ट केले आहे असेही महेश तपासे म्हणाले.