शहरावर उन्हाळ्यात पाणीकपातीचे संकट टाळण्यासाठी पालिकेला हवे 8 टीएमसी पाणी

पुणे- महापालिकेकडून शहरासाठी सध्या खडकवासला धरणातून प्रतिदिन 1470 एमएलडी तर भामाआसखेड धरणातून प्रतिदिन 150 ते 170 एमएलडी पाणी शहरासाठी घेतले जाते. सध्या शहरात कोणतीही पाणीकपात नाही. त्यामुळे ऑगस्ट अखेरपर्यंत 7.94 टीएमसी पाणी महापालिकेस राखीव ठेवले गेल्यास शहरावर उन्हाळ्यात पाणीकपातीचे संकट ओढावणार नाही. मात्र, पालिकेने पाण्याची मागणी केलेली असली तरी अंतिम निर्णय मात्र, शासन तसेच जलसंपदा विभाग घेणार असल्याने त्यांच्या निर्णयावरच शहराची पुढील पाण्याची स्थिती निश्‍चित होणार आहे.

उन्हाळा यंदा तीव्र असण्याची चिन्हे आहेत. तसेच “एल-निनो’मुळे पावसाचे प्रमाणही कमी राहण्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहेत. यावर खरबदारीचा उपाय म्हणून पाणी व्यवस्थापन आराखडा व आकस्मिक पाणीपुरवठा नियोजन आराखडा करा, असे आदेश राज्य शासनाने महापालिकेस दिले आहेत. हे आराखडे 28 मार्चपर्यंत सादर करणे आवश्‍यक आहे. उन्हाळ्यातील स्थितीबाबत महापालिका आणि पाटबंधारे विभागाची बैठक नुकतीच झाली. पालिकेकडून या बैठकीत चर्चेच्या आधारावर हे दोन्ही आराखडे तयार केले जाणार असल्याची शक्‍यता आहे.

राज्यात यंदा पावसाळा लांबल्यास पाणीटंचाईची स्थिती उद्भवण्याची शक्‍यता आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने महापालिकेस 31 ऑगस्टअखेर शहरासाठी किती पाणी हवे, याची माहिती पाटबंधारे विभागास सादर करण्याची सूचना केली आहे.

यानुसार, अखेर पालिकेने आपला अहवाल पाटबंधारे विभागाकडे पाठविला आहे. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांसाठी खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातून 7.94 टीएमसी पाणी राखीव ठेवण्याची मागणी केली आहे. खडकवासला धरणसाखळीत आज अखेर 13.77 टीएमसी पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा भामाआसखेड धरणातून घेतले जाणारे पाणी वगळून असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

राज्यात दरवर्षी उन्हाळ्यात नागरी भागात पाणीटंचाई निर्माण होते. ही बाब लक्षात घेऊन आगामी कालावधीत पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये. तसेच उद्‌भवल्यास यंत्रणा सज्ज असावी, या उद्देशाने राज्याच्या मुख्य सचिवांनी 13 मार्चला बैठक घेतली होती. या बैठकीनंतर हे आदेश देण्यात आले होते. मात्र, पालिकेकडून हा आराखडा पाठवण्यास दिरंगाई केल्याने शासनाने नाराजीही व्यक्‍त केली होती. अखेर पालिका प्रशासनाने जलसंपदा विभागाकडे माहिती सादर केली असून 31 ऑगस्टअखेर पर्यंतसाठी 7.94 टीएमसी पाण्याची मागणी केली आहे.