मुस्लिम बांधवांनी आपल्या विकासासाठी सामाजिक सुधारणांचा अंगीकार केला पाहिजे – शमसुद्दीन तांबोळी

पुणे – हिजाबबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणावर सुनावणी करताना कर्नाटक उच्च न्यायालयाने सांगितले की, हिजाब हा इस्लामचा अनिवार्य भाग नाही आणि शालेय विद्यार्थी गणवेश घालण्यास नकार देऊ शकत नाहीत. यासोबतच महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्याची परवानगी मागणारी मुस्लिम विद्यार्थिनींची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. शैक्षणिक संस्थांच्या परवानगीसाठी दाखल करण्यात आलेल्या अनेक याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.

हिजाब बाबत कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर सर्व ठिकाणी त्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान, जी निरक्षणे कर्नाटक न्यायालयाने नोंदवली आहेत, ती वस्तुस्थितीला धरुन आहेत. या निर्णयाचे मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वतीने स्वागत करतो असे मत मुस्लिम धर्माचे अभ्यासक शमसुद्दीन तांबोळी यांनी म्हटले आहे.

धर्मवाद्यांना बाजूला ठेवून न्यायालयाने घेतलेला निर्णय आहे. मुस्लिम बांधवांनी आपल्या विकासासाठी सामाजिक सुधारणांचा अंगीकार केला पाहिजे, असे केले तर वादाचे मुद्दे पुढे येणार नाहीत असे तांबोळी यांनी म्हटले आहे.