शैक्षणिक संस्थांमध्ये शिस्त महत्वाची असते, त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचा धार्मिक पगडा असू नये – निकम

मुंबई – हिजाबबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणावर सुनावणी करताना कर्नाटक उच्च न्यायालयाने सांगितले की, हिजाब हा इस्लामचा अनिवार्य भाग नाही आणि शालेय विद्यार्थी गणवेश घालण्यास नकार देऊ शकत नाहीत. यासोबतच महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्याची परवानगी मागणारी मुस्लिम विद्यार्थिनींची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

शैक्षणिक संस्थांच्या परवानगीसाठी दाखल करण्यात आलेल्या अनेक याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. हिजाब बाबत कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर सर्व ठिकाणी त्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान, आज कर्नाटक न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये शिस्त महत्वाची असते. त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचा धार्मिक पगडा असू नये असे ते म्हणाले.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा अर्थ कशाचेही स्वातंत्र्य आहे असे नाही असेही निकम म्हणाले. आज न्यायालयाने दिलेला निर्णय वैचारिक क्रांती घडवून आणेल असेही निकम म्हणालेत.  शिक्षण हे कोणत्याही धार्मिक गोष्टीपासून दूर असले पाहिजे. शिक्षण संस्थांच्या नियमानुसार राहावेच लागेल.