उत्तर भारतीय मोर्चाने सेवा कार्याच्या माध्यमातून पक्ष वाढवावा; चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

Mumbai _ उत्तर भारतीय मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सेवा ही संघटन या मंत्राच्या आधारावर काम करून पक्षाचे काम वाढवावे. कृपाशंकर सिंग यांच्यासारखा ज्येष्ठ नेत्याच्या मार्गदर्शनाखाली उत्तर भारतीय मोर्चाने विविध उपक्रमांच्या माध्यमातून पक्षाचे काम तळागाळापर्यंत न्यावे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Bharatiya Janata Party State President Chandrakant Patil)  यांनी गुरुवारी केले. भाजपा प्रदेश उत्तर भारतीय मोर्चाच्या प्रभारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजपा प्रदेश उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह (BJP state vice president Kripashankar Singh)  यांचा गुरुवारी सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष पाटील बोलत होते. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला उत्तर प्रदेश भाजपा प्रवक्ते ओमप्रकाश सिंह, भाजपा प्रदेश सचिव अखिलेश चौबे, उत्तर भारतीय मोर्चाचे सरचिटणीस डॉ. संजय पाण्डेय आदी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, उत्तर भारतीय मोर्चाने भाजपाचे काम वाढविण्यासाठी बूथ पातळीवर रचना केली पाहिजे. त्याचबरोबर उत्तर भारतीयांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला पाहिजे. विविध सेवा उपक्रम राबविले तर उत्तर भारतीय जनता पक्षाशी जोडली जाईल. या प्रसंगी कृपाशंकर सिंह यांनी सांगितले की, राष्ट्र प्रथम आणि पक्ष नंतर या विचारधारेमुळे आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. या विचारधारेसाठी आपण कायमच कार्यरत राहू. महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी उत्तर भारतीय नेहमीच अग्रभागी राहतील.

उत्तर भारतीय मोर्चाने राज्यात पक्षाचा पाया मजबूत कारण्यासाठी आजवर नेहमीच प्रयत्न केले आहेत. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारी राजवट उलथवून टाकण्यासाठी उत्तर भारतीय मोर्चाचे कार्यकर्ते आपली सर्व शक्ती पणाला लावतील, अशी ग्वाही उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय पाण्डेय यांनी दिली.   मोर्चाचे सरचिटणीस ब्रिजेश सिंह, प्रद्युम्न शुक्ला यांचीही यावेळी भाषणे झाली.