आपले हिंदू राष्ट्र आहे हे सांगण्याची, दाखवण्याची आवश्यकता नाही; जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

मुंबई   –अमेरिकेत कोणत्याही धर्माचा, जातीचा भेदभाव अजिबात नाही. त्यामुळे तो देश वेगाने प्रगती करु शकला. त्याचपध्दतीने भारताची प्रगती आपण सर्व धर्मनिरपेक्ष विचाराने आजपर्यंत करत आलो आहोत. मात्र आता अशा भूमिका भाजपचे काही प्रमुख नेतेच मांडणार असतील तर ती चिंतेची बाब आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (NCP state president and former water resources minister Jayant Patil) यांनी  माध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली.

देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आणि ‘भारत हे हिंदू राष्ट्र होते हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदू राष्ट्रच राहिल’ असलेले ट्वीट भाजपच्या ट्वीटर पेजवर करण्यात आले आहे. त्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना जयंत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले.

जगात ज्यावेळी धर्माला जास्त महत्व दिले जाते त्यामध्ये विशेषतः सर्व मुस्लिम राष्ट्र आहेत त्यांची फारशी प्रगती झालेली नाही. अमेरीका, इंग्लंडसारख्या राष्ट्रात गेलात तर सर्वांचे स्वागत होते आणि त्या देशांची प्रगती वेगाने झाली आहे. त्यामुळे आपले हिंदू राष्ट्र आहे हे सांगण्याची, दाखवण्याची आवश्यकता नाही असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

आपण बहुसंख्य हिंदू भारतात राहतो आणि भारताच्या सर्व व्यवस्थेवर हिंदू धर्मात असणार्‍या विद्वान लोकांचा वेगवेगळ्या क्षेत्रात मोठा प्रभाव आहे. पण आपलेच हिंदू अमेरिकेत जाऊन देखील अनेक मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओ झाले आहेत. जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी भारतीय हिंदू समाज हा गेलेला आहे याची आठवणही जयंत पाटील यांनी करुन दिली आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात जो वाद सुरू आहे तो सुप्रीम कोर्टात गेला आहे.त्यात न्यायाधीशांचे पॅनल होणार आहे किंवा आहेत ते दोन्ही राज्यांपेक्षा वेगळया राज्याचे असले पाहिजेत जे ऑब्जेक्टिव्ह विचार आणि त्यात भौगोलिक व सामाजिक परिस्थितीचा विचार करून निर्णय देतील. त्यामुळे अजून एका न्यायाधीशांनी बॅकआऊट केले आहे तर अजून बराचकाळ हे प्रकरण लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीमा भागात असणाऱ्या मराठी माणसांना तातडीने न्याय मिळण्याची अपेक्षा कमी झाली आहे त्यामुळे देशाच्या सरन्यायाधीशांनी यामध्ये लक्ष घालावे अशी मागणीही जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना केली .