भाजप नेत्या सना खान जबलपूरला पोहोचल्यानंतर बेपत्ता, नातेवाईकांनी पतीवर केला गंभीर आरोप

Sana Khan : महाराष्ट्र भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या नेत्या सना खान या जबलपूरमधून बेपत्ता झाल्या आहेत. सना खानचे कुटुंबीय तिचा शोध घेत आहेत. मंगळवारी मध्य प्रदेशच्या गोराबाजार पोलिसांनी माहिती दिली की, सना खानचा अद्याप कोणताही सुगावा लागला नाही. सना खानची हत्या झाल्याची भीती नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

नागपुरातील मानकपूर भागातील सना खानने सहा महिन्यांपूर्वी बिल्हारी येथील ढाबा ऑपरेटर अमित सिंग (पप्पू) याच्याशी लग्न केले. 1 ऑगस्ट रोजी आईला सांगून ती जबलपूरला निघाली. 2 ऑगस्ट रोजी सनाने नातेवाईक इम्रानला फोन करून जबलपूरला पोहोचल्याची माहिती दिली. त्याच दिवशी संध्याकाळी इमरानशी फोनवर बोलत असताना सनाने तिला पतीने केलेल्या मारहाणीची माहिती दिली.

इम्रानने ही माहिती सनाच्या आईला दिली.मेहरुन्निसा यांनी सनाशी बोलण्याचा प्रयत्न केला असता तिचे तीनही मोबाईल बंद आढळले. यानंतर मेहरुन्निसा यांनी सनाच्या पतीला फोन केला. अमित साहूने सांगितले की, दोघांमध्ये भांडण झाले आणि सना एकटीच घरातून निघून गेली. ती कुठे गेली हे माहीत नाही.

मंगळवारी सनाचा भाऊ मोसीन, मोबीन खान यांनी गोराबाजार पोलीस ठाणे गाठून अमितने आपल्या बहिणीची हत्या करून मृतदेह हिरण नदीत फेकल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी काही सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले आहेत. मोसीन आणि मोबीनचा आरोप आहे की ढाब्यावर काम करणाऱ्या एका नोकराने त्यांना माहिती दिली की 2 ऑगस्टला अमित त्याची कार घेऊन आला होता, ज्याच्या ट्रंकमध्ये रक्त होते. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.