अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी निधी कमी पडणार नाही – चंद्रकांत पाटील

सोलापूर – पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे काम, त्यांची शौर्याची यशोगाथा, विकासाची हातोटी आणि आध्यात्मिक बैठक यामुळे त्यांचे नाव या विद्यापीठाला दिले आहे. या विद्यापीठाला नाव देऊन न थांबता 14 कोटींचा निधी दिला आहे. विद्यापीठ परिसरात होणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही, याची ग्वाही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे कौशल्य विकास अभ्यासक्रमाचा पहिला दिक्षांत समारंभ, हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पाटील बोलत होते. महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राला 4 कोटींचा निधी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या अंदाजपत्रकासाठी 54 कोटींचा निधी प्रस्तावानुसार मिळेल. कौशल्य विकासासाठी 10 कोटींच्या निधीचीही घोषणा  पाटील यांनी केली.

राज्याचा लौकिक क्रीडा प्रकारात वाढावा, चांगले खेळाडू तयार व्हावेत, यासाठी खेळाला प्राधान्य देण्यात येत आहे. सोलापूर विद्यापीठाने खेळाचा सर्वंकष आराखडा तयार करावा. खेळाच्या साहित्यासाठी सीएसआर फंडातून मदत मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.