बेळगाव सीमा प्रश्नी तब्बल पाच वर्षानी सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

मुंबई :-वर्षानुवर्षे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या बेळगाव प्रश्नावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तब्बल पाच वर्षानी हे प्रकरण पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी येत असल्याने सीमावर्ती भागातील नागरिकाप्रमाणेच संपूर्ण राज्याचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)  यांनी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात राज्याची बाजू मांडणाऱ्या वकिलांशी फोनवरून चर्चा केली.

सर्वोच्च न्यायालयात बेळगाव प्रश्नावर होणारी सुनावणी अनेकदा पुढे ढकलण्यात आलेली आहे. यापूर्वी 2017 साली याप्रकरणी सुनावणी पार पडली होती. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी या प्रश्नावर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीवेळी ज्येष्ठ वकील राकेश द्विवेदी, शिवाजीराव जाधव हे महाराष्ट्र राज्याची बाजू मांडणार आहेत. तर राज्याकडून अवर सचिव सदाफुले हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी कर्नाटक राज्याने दाखल केलेल्या 12 अ या अंतरिम अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सूनवणीबद्दल माहिती घेऊन या सुनावणीबाबत दिल्लीतील वकिलांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यावेळी त्यांनी राज्याची बाजू भक्कमपणे मांडण्याची विनंती त्यानी ज्येष्ठ वकिलांना केली. काहीही झालं तरीही सीमावर्ती भागातील नागरिकांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यानी यासमयी बोलताना स्पष्ट केले.