मेटेंचा मृत्यू जर घातपाती होता असे चव्हाणांचे म्हणणे असेल तर गेले ६ महिने ते तोंड शिवून का गप्प बसले होते? 

Pune – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण (Ashok Chavan) हे नांदेड येथे बोलताना,’माझा विनायक मेटे’ होईल असे वक्तव्य करून मराठा समाजाची सहानुभूती मिळविण्याचा निंदनीय प्रयत्न केला, याचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत, असं शिवसंग्रामचे जेष्ठ नेते आणि प्रवक्ते तुषार काकडे (Tushak Kakade) यांनी म्हटलं आहे.

ते म्हणाले,  वास्तविक उद्धव ठाकरेंच्या शासन काळात अशोकराव चव्हाण हे मराठा विषयक उपसमितीचे अध्यक्ष होते व त्याच काळात मराठा आरक्षण रद्द झाले. सर्वोच्च न्यायालयात माजी न्या.गायकवाड यांचा अहवाल संपूर्ण मांडलाच गेला नाही. तसेच मराठा समाजाच्या खालावलेल्या परिस्थिती बाबतचे शपथपत्रही त्या सरकारकडून न्यायालयात दाखल केले नाही. यामुळेच मराठा आरक्षण रद्द झाले. यास सर्वस्वी अशोक चव्हाण हे जबाबदार आहेत. आरक्षण व्यतिरिक्त इतर बाबींचीही हेळसांड झाली.

यावर पांघरूण घालण्यासाठी ते स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या नावाचा दुरूपयोग करीत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चव्हाणांनी उपसमितीचे अध्यक्ष या नात्याने जे पत्र लिहिले होते ते पत्र सर्व प्रसार माध्यमांसमोर उघड करावे असे आम्ही आव्हान देत आहोत.

अशोक चव्हाणांनी स्वतःचा निष्क्रिय कारभार व त्यामुळे समाजाचे कधीही भरून न येणारे नुकसान व समाजाशी केलेली गद्दारी झाकण्यासाठी स्वर्गीय मेटे साहेब यांच्या अपघाती मृत्यूस घातपाती मृत्यू ठरविण्याचा किळसवाणा प्रकार केलेला आहे.

स्व.मेटेसाहेबांचा मृत्यू जर घातपाती होता असे त्यांचे म्हणणे असेल तर गेले ६ महिने ते तोंड शिवून का गप्प बसले ? त्यांच्याकडे त्याबाबतीत काही पुरावे असतील तर ते त्यांनी मा.न्यायालय व पोलीस खात्याकडे सुपूर्द करावेत. अन्यथा आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल. असा इशाराही त्यांनी दिलाय.