उदयनराजे भोसले त्यांना त्यांच्या आयुष्यात खूप गोष्टींची परतफेड करावी लागणार आहे – राष्ट्रवादी

‘मुंबई – कालचा संपूर्ण दिवस एसटी कर्मचारी (ST Workers)आणि त्यांच्या आंदोलनामुळे गाजला. काल एसटीच्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक (Silver oak) या निवासस्थानी धडक दिली . यावेळी जोरदार घोषणाबाजीसह आंदोलकांनी यावेळी पवार यांच्या घरावर चप्पल फेक केली तसेच काही आंदोलकांनी बांगड्या देखील फेकल्या .

या अचानक घडलेल्या घडामोडींमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. दोन्ही बाजूंनी चिखलफेक होत असून यावर आता खासदार छत्रपती उदयनराजे भोसले(Udayanraje Bhosale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, काय सांगायचं? माझ्याकडून काय अपेक्षित आहे. मी असं बोललं पाहिजे बरं झालं, चांगले केले. अजून दगडं मारायला पाहिजे. फार छोटा विचार आहे. कर्म असतं, जे आपण या जन्मी करतो तेच आपल्याला फेडावं लागते. हे माझ्यासह सर्वांनाच लागू आहे. यावर अजून काय बोलणार? असं भाष्य त्यांनी केले आहे.

दरम्यान, भोसले यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्ट्रो यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, उदयनराजे भोसले म्हणाले की, “तुम्ही जे कर्म कराल, त्याची परतफेड या जन्मातच करावी लागेल. अशा परिस्थितीत, मला #उदयनराजेभोसले यांच्याबद्दल आतापासूनच दुःख आणि वाईट वाटत आहे, कारण त्यांना त्यांच्या आयुष्यात खूप गोष्टींची परतफेड करावी लागणार आहे.” असं ते म्हणाले.