हिटलरच्या दलालांना याची किंमत मोजावीच लागेल; पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर मिटकरी आक्रमक

मुंबई – कालचा संपूर्ण दिवस एसटी कर्मचारी (ST Workers)आणि त्यांच्या आंदोलनामुळे गाजला. काल एसटीच्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक (Silver oak) या निवासस्थानी धडक दिली. यावेळी जोरदार घोषणाबाजीसह आंदोलकांनी यावेळी पवार यांच्या घरावर चप्पल फेक केली तसेच काही आंदोलकांनी बांगड्या देखील फेकल्या .

या अचानक घडलेल्या घडामोडींमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर प्रामुख्याने या सर्व घटनांच्या मागे असल्याचा आरोप होत असून याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान, या सर्व संतापजनक प्रकारावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, सदावर्तेमुळे महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणाला हरताळ फासण्याचा प्रयत्न झालाआहे. यामागील मास्टरमाइंड शांत बसून आसुरी आनंद घेत आहेत. विरोधी पक्षाचे नेते साधा शब्दही काढायला तयार नाहीत. जे चाललंय ते खरच खुप भयंकर आहे. हिटलरच्या दलालांना याची किंमत मोजावीच लागेल.