ज्यांनी आमच्यावर टीका केली आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसत आहात ? शिंदे गटाला ठाकरेंचा सवाल 

Mumbai – विधिमंडळातील एकनाथ शिंदे यांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली असून शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण जाण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण चिन्हासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात कायदेशीर लढाई होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धक्के देणे सुरूच आहे.

या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. ते म्हणाले, एक चर्चा सुरु आहे शिवसनेच्या चिन्हाबाबत. कायद्याच्या दृष्टीने बघतिलं तर धनुष्यबाण शिवसेनेपासून हिरावून घेऊ शकत नाही. मतदान पत्रिकेवर चिन्हं महत्त्वाचं आहे, पण हे धनुष्यबाण हाती घेतलेल्या माणसाची चिन्हं लोकं बघतात, माणूस बघुन मतदान करतात. नवीन चिन्हांचा विचार करत नाही हे मुद्दामून तुम्हाला सांगत आहे.असं ठामपणे ते म्हणाले.

ते म्हणाले,  आजपर्यंत गप्प असणारे तिकडे जाऊन बोलतायत. या लोकांना आजही उद्धव ठाकरेंबद्दल प्रेम आहे, आदित्यबद्दल आणि मातोश्रीबद्दल प्रेम आहे. खरंच धन्य झालो. ज्यांनी टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात. मग तुमचं हे प्रेम खरं आहे की खोटं हे जनतेला कळू द्या. शिवरायाचा महाराष्ट्र आहे. डोळे नसलेल्या धृतराष्ट्राचं राज्य नाही, असेही ठाकरे यांनी शिंदे गटाला खडसावलं.