Sharad Pawar | “निवडणूक झाल्यावर दोन आठवड्यांनी शरद पवारांनी बोगस मतदानाचे आरोप करणे मनाला न पटणारे”

Sharad Pawar | बीड लोकसभा मतदारसंघातील मतदान 13 मे रोजी संपन्न झाले. मात्र 13 मेला तब्बल दोन आठवडे उलटून गेल्यानंतर तुतारी गटाला राहून राहून बीड जिल्ह्यात व विशेषकरून परळी मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचे साक्षात्कार घडत आहेत, हे अत्यंत हास्यास्पद आहे. बाल मित्र मंडळाचे अध्यक्ष रोहित पवार यांनी याबाबत काही व्हीडिओ पोस्ट केले होते. त्यावरून सोशल मीडियावर त्यांची चांगलीच पंचाईत सुद्धा झाली. मात्र तरीही रडून पडून माझंच खरं असं ते म्हणायचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसले, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी केली.

उमेश पाटील म्हणाले, मुळात कुठल्याही मतदान केंद्रावर जर मतदान बोगस झाले किंवा बूथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला, किंवा मतदान प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गोंधळ झाला तर त्याची तक्रार करायची विशिष्ट कार्यपद्धती असते, हे बाल मित्र मंडळाच्या अध्यक्षाला माहीत नसेल असे समजू मात्र आता खुद्द पवार साहेब सोशल मीडियाच्या आधारे बीड जिल्ह्यात बोगस मतदान झाल्याचे आरोप करत आहेत, हे ऐकून जरा आश्चर्यच वाटले.

शरद पवार (Sharad Pawar) यांनी हजारावर निवडणुका पाहिल्यात आजवर, त्यांनी असे आरोप आणि तेही निवडणूक झाल्यावर दोन आठवड्यांनी करणे, हे मनाला न पटणारे आहे. पुढे त्यांनी सांगितले, बर याचीच दुसरी बाजू पहायची म्हटलं तर, रोहित पवारांनी जे व्हीडिओ व्हायरल केले आहेत, ते परळीमधील आहेत असे समजु, त्यात काय दिसते? एक मोठ्या दाढीवाला पवार साहेबांच्या पक्षाचा एक तथाकथित नेता बूथ मध्ये घुसून मतदान प्रक्रिया बंद पाडून शासकीय अधिकारी-कर्मचारी यांना शिवीगाळ व दमदाटी करत आहे. काही महिला कर्मचारी देखील तिथं उपस्थित दिसतात, तरीही तो इन कॅमेरा शिव्या देतोय, धमक्या देतोय. मतदान केंद्रावर असा प्रवेश? व्हीडिओ रेकॉर्डिंग? शिवीगाळ? दमदाटी? धमक्या? हे सगळं कोणत्या अधिकाराने व कोणत्या नियमाने होत असेल, याचेही उत्तर पवार साहेब देतील का?

दुसऱ्या एका व्हीडिओ मध्ये तर कहर आहे; पवार साहेबांच्या पक्षाचा तथाकथित बूथ एजंट म्हणून नियुक्त असलेला गवळी नामक व्यक्ती, तोच स्वतः मतदान केंद्रावर फेसबुक लाईव्ह करतो! आणि मतदान सुरू असताना गोंधळ घालून ते बंद पाडण्याचा प्रयत्न करतो! तो व्हीडिओ अजूनही रोहित पवार यांच्या ट्विटरवर आणि त्या गवळी नामक व्यक्तीच्या फेसबुक वर जसेच्या तसे उपलब्ध आहेत!

बूथ एजंटने बूथ मध्ये घुसून फेसबुक लाईव्ह करणे कोणत्या कायद्यात बसते? यावर काही कारवाई होणार का? पवार साहेबांनी यावर कारवाईची मागणी का केली नसावी? असा साधा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो.

सर्व ज्ञात अज्ञात शक्ती वापरून प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण करून सुद्धा शेवटी पराभवच समोर दिसू लागल्याने कदाचित असे बेछूट आरोप करून बीड जिल्ह्याची, प्रभू वैद्यनाथांचे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीची व धनंजय मुंडे यांच्या वरील व्यक्तिगत रागामुळे त्यांची, केवळ आणि केवळ बदनामी करण्यासाठी हे सगळं सुरू आहे. आदरणीय वरिष्ठ नेत्यांनी हे सगळं आता थांबवायला व वरील गोष्टींचा विचार करायला हवे!, असे उमेश पाटील यांनी म्हटले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप