CM Eknath Shinde | डोंबिवली एमआयडीसीमधील दुर्घटनास्थळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भेट

एमआयडीसी परिसरातील अमुदान केमिकल कंपनीतील रिऍक्टरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या भीषण स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला असून 60 जण जखमी झाले आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी एम्स रुग्णालयाला भेट देऊन या दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

आज दुपारी दोनच्या सुमारास डोंबिवली एमआयडीसी परिसर पुन्हा एकदा भीषण स्फोटाचा आवाजाने हादरला. या स्फोटाचे लोट 2 किलोमीटर लांबूनही दिसत होते. या स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की आजूबाजूच्या इमारती आणि कंपन्यांमध्येही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी डोंबिवलीत येऊन या घटनास्थळाला भेट दिली. यानंतर मंध्यमांशी बोलताना त्यांनी घटनास्थळी बचावकार्य अजूनही सुरू असून आजूबाजूच्या कंपनीतील काही कर्मचारी अजूनही अडकले असल्याची शक्यता असल्याचे सांगितले.

या दुर्घटनेनंतर राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. डोंबिवली एमआयडीसी परिसरातील कंपन्यांचे उद्योग,कामगार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि औद्योगिक सुरक्षा विभागाचे संचालक यांच्या माध्यमातून ए, बी, सी, आशा तीन श्रेणीत वर्गीकरण करून त्यातील अतिधोकादायक कंपन्या अंबरनाथ एमआयडीसीमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कंपन्याना या जागेचा चेंज ऑफ युज करणे अथवा ही कंपनी अंबरनाथ एमआयडीसी परिसरात विस्थापित करण्याचे पर्याय देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच राज्यातील इतर एमआयडीसी मधील कंपन्यांच्या सुरक्षिततेची देखील तपासणी करण्याचे निर्देश उद्योग मंत्र्यांना दिल्याचे सांगितले. या दुर्घटनेची चौकशी करून ती नक्की का घडली..? याचा शोध घेऊन दोषींवर कारवाई करण्यात येईल असेही यावेळी बोलताना शिंदे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान घटनास्थळी भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी एम्स रुग्णालयात जाऊन या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीच्या तब्येतीची विचारपूस केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप